धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपीचा अंतीम युक्तिवाद संपला असुन त्यातील काही आरोपीनी लेखी युक्तीवाद सादर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार असुन यात लेखी युक्तीवादाला प्रतिउत्तर दिले जाणार आहे. काही आरोपी वारंवार सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने सर्व आरोपीना पुढील सुनावणी वेळी सक्तीने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा खटला अंतीम टप्प्यात आहे.
गैरहजर राहण्याचा अर्ज मान्य केला जाणार नाही अशी तंबी कोर्टाने दिली आहे. 28 जानेवारीला याची सुनावणी झाली त्यात कोर्टाने तंबी दिली. हा खटला जलदगतीने चालवुन 27 मार्च 2026 पुर्वी निकाल द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हत्येचा कट व सुपारी दिल्याचा गुन्हा याच हत्याकांड तपासात उघड झाला असुन तो न्याय प्रविष्ट आहे.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री तथा तत्कालीन खासदार डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात केला आहे.
पवनराजे निंबाळकर यांची 3 जुन 2006 रोजी हत्या झाल्यानंतर त्याचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीआयडी त्यानंतर सीबीआयने केला. आनंदीदेवी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने हा तपास 23 ऑक्टोबर 2008 रोजी सीबीआयकडे वर्ग केला त्यानंतर सीबीआयने 7 महिन्यांनी पारसमल जैन याची मुलगी वर्षा हिच्या पत्रानंतर 25 मे 2009 रोजी गुन्ह्याची उकल केली. हत्याकांडनंतर तब्ब्ल 3 वर्षांनी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना आरोपी करीत अटक केली.
माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.
मुख्य संशयित आरोपी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य 3 आरोपींचा अंतीम युक्तिवाद 25 नोव्हेंबरला संपल्यानंतर सतीश मंदाडे, मोहन शुक्ला व शशिकांत कुलकर्णी या 3 संशयित आरोपींच्या वतीने ऍड गिरीश कुलकर्णी यांनी कोर्टात अंतीम युक्तिवाद सादर केला. डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक यांनी सलग 24 सुनावणीत बाजु मांडली. शुटर दिनेश तिवारी, महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी, गजेंद्र उर्फ छोटे पांडे व कैलास यादव या 4 आरोपींच्या वतीने ऍड मधुसूदन पारेख यांनी 23 डिसेंबर रोजी कोर्टात बाजु मांडली.
सरकार पक्षाच्या वतीने सीबीआय व तक्रारदार / याचिकाकर्ता आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने लेखी युक्तीवाद सादर केला आहे. सीबीआयच्या वतीने ऍड एजाज खान, आनंदीदेवी निंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड यांनी बाजु मांडत आहेत.












