धाराशिव – समय सारथी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार व इतर विधी करण्यात आले. पवार यांच्या जागी उपमुख्यमंत्री होण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी होकार दिला असुन त्या उद्या सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणुन शपथ घेणार आहेत. त्या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत.
सुनेत्रा पवार ह्या सकाळी 8 वाजता विशेष हेलिकॉप्टरने बारामतीहुन मुंबईला जातील. त्यानंतर दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार असून त्यानंतर त्या 5 वाजता शपथ घेतील. अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडणार आहे.
सुनेत्रा पवार ह्या धाराशिव तालुक्यातील तेर येथील असुन त्या डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत. पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याने ही बाब धाराशिवकरांसाठी अभिमानास्पद आहे. अजित पवार यांच्या जाण्याने जी पोळकी निर्माण झाली होती ती आता सुनेत्रा ताई यांच्या रूपाने भरून काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी तेर येथे झाला. सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला आहे. डॉ पाटील व शरद पवार यांच्या संबंधातुन त्यांचा अजित पवार यांच्याशी विवाह झाला.
2023 साली अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री झाले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेच्या विरोधात उमेदवारी दिली.सुप्रिया सुळे यांना 7.31 लाख मते मिळाली होती. तर सुनेत्रा पवार यांना 5.73 हजार मते मिळाली होती. सुप्रिया सुळे यांनी 1.59 लाख मतांनी विजय मिळवला होता.
लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली. प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. या जागेवर 13 जून 2024 रोजी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या.आता त्या उपमुख्यमंत्री होणार आहेत.












