धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असुन दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे. दुपारी 4 नंतर अर्ज शिल्लक राहिलेल्या अपक्ष उमेदवार यांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. चिन्ह वाटप व उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने ‘रणसंग्राम’ पेटणार आहे.
तिकीट वाटपावरून शिवसेना भाजप युतीत मोठा संघर्ष असुन शिवसैनिकांना डावलून शिवसेनेच्या जागेवर भाजप उमेदवार यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक आक्रमक आहेत. या घमासान नंतर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची भेट घेतली. पळसप गटासह काही जागावर उमेदवारी बदलाचे संकेत पालकमंत्री यांनी दिले, त्यामुळे आमदार पाटील यांची ‘सावली’ अशी ओळख असलेले नेताजी पाटील माघार घेणार का हे आज स्पष्ट होणार आहे.
भुम परंडा वाशी येथील जिल्हा परिषदेच्या 13 व पंचायत समितीच्या 26 जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. पालकमंत्री यांनी शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात ह्या जागा शिवसेनेच्या आहेत असे म्हणटले मात्र या ठिकाणी आमदार तानाजीराव सावंत व भाजप सह इतर सर्व पक्ष एकत्र येतात असे नगर परिषदेचे चित्र होते. त्यामुळे भाजपने या 13 जागेवर दिलेले उमेदवार माघार घेतात का हे पाहावे लागेल. भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांचा निर्णय व भुमिका इथे अंतीम मानली जाते मात्र आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सरनाईक यांच्याशी बोलणी केली.
अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या जिल्हा परिषद निवडणुक लढवणार नाहीत अशी भुमिका मल्हार पाटील यांनी स्पष्ट केली होती, सामान्य कार्यकर्ते यांना संधी व न्याय देण्यासाठी त्यांनी ‘त्याग’ केला अशी भुमिका आहे मात्र अनेक कायास लावले जात आहेत, त्याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. त्यांनी केशेगाव व तेर या 2 गटातुन अर्ज भरला होता, त्यांच्याकडे अध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणुन पाहिले जात होते.












