धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील तयारी, तसेच विकासाभिमुख अजेंडा घेऊन भाजपा कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा विश्वास, राज्यातील यशस्वी नेतृत्व आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची ताकद याच्या जोरावर भाजपाचा विजय निश्चित आहे असा विश्वास जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.
पंचायत समितीच्या 110 जागांसाठी सुमारे 392 इच्छुकांनी, तर जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी तब्बल 320 असे एकूण 712 इच्छुकांनी इच्छुक अर्ज भाजपा कार्यालयात दाखल केले आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आहे. दरम्यान पक्षाकडून वेळोवेळी कार्यकर्ता संवाद मेळाव्यांच्या माध्यमातून निवडणुकीची रणनिती आखली जात असून, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या व जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुक असले तरी उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पारदर्शक पद्धतीने घेतला जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, असा विश्वासही देण्यात आला आहे. आपण सर्वांनी एकसंघपणे लढा दिल्यामुळेच नगरपालिका निवडणुकांमध्ये ऐतिहासिक यश मिळाले. याच एकतेच्या जोरावर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही महायुतीचे सर्वच उमेदवार इतिहासात नोंद होईल असे यश संपादन करतील असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाचा माध्यमातून व्यक्त केला आहे.












