धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडुन पुन्हा तीच खेळी खेळली जात असुन भाजप शिवसेना युतीसाठी मुंबईत बोलणी झाली आहे. शिवसेनेचे काही नेते व पदाधिकारी यांच्याशी जागा वाटपाची मुंबईत चर्चा अंतीम झाली आहे. या चर्चेत व निर्णय प्रक्रियेत आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्यासह महत्वाच्या काही स्थानिक पदाधिकारी यांना मात्र पद्धतशीरपणे बाजुला ठेवले गेले. सावंत यांचे काही शिलेदार फोडण्यासाठी भाजपने थेट संपर्क साधुन अभियान सुरु करीत पेरणी केली आहे.
भाजप व शिवसेनेच्या काही नेत्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांसह अन्य नेत्यांशी चर्चा व भेट घेतली असल्याची माहिती आहे. आमदार सावंत वगळता सर्व जणांचा भाजप शिवसेना युतीला पाठिंबा असल्याचे चित्र रंगवले गेले आहे. सावंत यांचा विरोध असल्याचे सांगत त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश द्यावे यासाठी फिल्डिंग लावली गेली मात्र सावंत यांनी त्यांचा ‘बाणा’ जपत शिंदे यांना स्पष्ट शब्दात नकार दिल्याची माहिती आहे.
एकीकडे पक्षश्रेष्टी तर दुसरीकडे पुतणे धनंजय सावंत यांच्या रूपाने ‘घरफोडी’ करून भाजप प्रवेशाची अशी दुहेरी व्युहरचना आखण्यात आली आहे. नगर परिषद निवडणुकीत सावंत यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र लढले होते, त्यासाठी काहींनी रसद पुरवली. विजयी निकालानंतर मात्र श्रेयासाठी भाजप शिवसेनेच्या काही नेत्यांनी महायुतीचा डंका वाजवला. लढताना विरोधात, विजय झाला की युतीचा दावा असे चित्र पाहायला मिळाले.
नगर परिषद प्रमाणे पुन्हा मुंबईत चर्चा झाली असुन स्थानिक नेत्याना किंमत न देता काही बाबीवर शिक्कामोर्तब केले असल्याने नाराजीचा सुर आहे त्यामुळे आगामी काळात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत बंडाचे निशाण फडकवले जाऊ शकते. जागा वाटपाबाबत महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यासह अन्य नेत्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत.












