पिता पुत्रावर गुन्हा नोंद, आरोपी फरार – बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
धाराशिव – समय सारथी
कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव अंतर्गत आडत दुकानातून शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजार समितीत विक्रीसाठी दिलेल्या शेतमालाची रक्कम न देता तब्बल 8 कोटी 81 लाख 89 हजार 857 रुपये अपहार केल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रस्ता रोको करीत कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर दरोडा टाकल्यासारखा आहे.
या प्रकरणातील आरोपी सुनिल विठ्ठल काकडे (मयत), विठ्ठल श्रीरंग काकडे व मिनील विठ्ठल काकडे असे आहेत. आरोपींनी 30 सप्टेंबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मार्केट यार्ड, धाराशिव येथील आडत दुकान लाईनमधील दुकान क्रमांक 28 येथे हा गैरप्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पवन चंद्रसेन माकोडे सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव यांनी फिर्याद दिली आहे.
बाजार समितीमध्ये विक्रीसाठी माल आणणाऱ्या 376 शेतकऱ्यांचा शेतमाल विश्वासाने स्वीकारून त्याची विक्री करण्यात आली. मात्र, विक्रीनंतरही संबंधित शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम अदा न करता आरोपींनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 31 डिसेंबर 25 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316(5),318(3),(4) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शेकडो शेतकरी आर्थिक संकटात सापडले असुन बाजार समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.












