प्रसार माध्यमावर दबाव – मुख्यमंत्री यांना आमदार कैलास पाटील यांचे सवाल
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला आहे. मुख्यमंत्री ड्रग्ज बाबत झिरो टॉलरन्स म्हणतात मात्र तुळजापूर येथे तसे होत नाही. लक्षवेधीचे उत्तर लीक प्रकरणात कारवाई केली नाही, अतुल अग्रवाल याचे नाव येऊनही तो मोकाट आहे. वस्तुस्थितीची बातमी लिहणाऱ्याला प्रसार माध्यमावर दबाव आणला जातो असे मुद्दे त्यांनी सभागृहात मांडले.
अंतीम आठवडा प्रस्ताव वेळी आमदार कैलास पाटील यांनी विधीमंडळात ड्रग्जसह अन्य मुद्दे मांडले. तुळजापूर ड्रग्जच्या अनुषंगाने आमदार कैलास पाटील यांनी मागील अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती, लक्षवेधी उत्तर सभागृहात पटलावर येण्याआधीच ते लीक झाले, त्यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी करू असे उत्तर सभागृहात दिले. दुसरे अधिवेशन संपत आले मात्र त्याची अद्याप चौकशी झाली नाही. लक्षवेधीचे उत्तर ही सभागृहाची प्रॉपर्टी असते, त्याचे उत्तर आधीच व्हाट्स ऍप ग्रुपवर लीक झाले, ही गंभीर बाब आहे. याबाबत काय कारवाई झाली याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली.
खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर, बार्शी व परंडा येथील ड्रग्जबाबतीत मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यात काही प्रश्न उपस्थितीत केले होते. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या काही आरोपी यांनी त्याच्या जबाबात मुंबई येथील अतुल अग्रवाल याच्याकडून ड्रग्ज खरेदी करीत असल्याचे सांगितले अद्याप त्याला आरोपी केले नसुन त्याला अटक केली नाही, हा झिरो टॉलरन्स कसा होऊ शकतो असा सवाल त्यांनी केला.
तपासात, दोषारोप पत्रात ज्या गोष्टी समोर आल्या त्यावर प्रसार माध्यमे बातमी करतात, लिहतात त्यांच्यावर राजकीय दबाव टाकायचा, पोलिसांमार्फत दबाव टाकायचा. तुळजापूरची बदनामी करताहेत म्हणुन दबाव टाकायचा. तुळजापूरची बदनामी काही चुकीच्या लोकांच्या वागण्याने होते, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना बाजुला केले पाहिजे. प्रसार माध्यमाची गळचेपी होत असल्याचे ते म्हणाले.
ड्रग्ज हा राजकीय प्रश्न नसुन सामाजिक प्रश्न आहे. भवितव्य म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे, जवळचा लांबचा न पाहता कारवाई झाली पाहिजे. तुळजापूर हे तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असुन तिथे काही ठराविक लोकांमुळे हे क्षेत्र बदनाम होत असेल तर हे आपल्यासाठी व महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की ड्रग्ज बाबतीत झिरो टॉलरन्स राहील मात्र तुळजापूरच्या बाबतीत टॉलरन्स का हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडत आहे.
राज्यातील जनतेच्या भविष्यासाठी ड्रग्ज हा सामाजिक प्रश्न बनला आहे. महानगर मोठ्या शहरासह छोट्या छोट्या शहरात देखील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकली आहे. लातूर, सातारा इथे ड्रग्ज सापडले, रोज कुठेतरी साठा सापडत आहे, ड्रग्जने महाराष्ट्र व्यापला आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे. जनजागृतीबरोबर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी ड्रग्ज बाबतीत मकोका कारवाईचे विधेयक आणले मात्र त्यात 50 ग्रॅम मर्यादा आहे. आरोपी पळवाट काढण्यासाठी ती मर्यादा क्रॉस होऊ देत नाहीत त्यामुळे मकोका लागत नाही. तीच ती लोक या ड्रग्ज रॅकेटमध्ये आहेत, एक पेक्षा जास्त ड्रग्ज गुन्हे असतील तर मकोका लावावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सभागृहात केली.












