धाराशिव – समय सारथी
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या काळात धाराशिवसह मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात जाऊन ते शेतकरी यांच्याशी संवाद साधुन दिलासा देणार आहेत. शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही याचा ते पंचनामा करणार आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत आढावा बैठक घेऊन संवाद साधतील. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे या दौऱ्याचे आयोजन करीत आहेत.
उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना या भागात जातील त्याच बरोबर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन संवाद साधतील.
5 नोव्हेंबर रोजी बुधवारी उद्धव ठाकरे हे दुपारी 2 वाजता भुम तालुक्यातील पाथरूड येथे, 3.30 वाजता परंडा तालुक्यातील शिरसाव येथे तर सायंकाळी 7 वाजता धाराशिव बीड लातूर येथील पदाधिकारी यांच्या सोबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन संवाद साधतील व तिथे मुक्काम करतील. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता करजखेडा येथे जातील त्यानंतर लातूर व नांदेड जिल्ह्यात दिवसभर कार्यक्रम व आढावा बैठका घेतील.












