धाराशिव – समय सारथी
140 कोटी रुपयांच्या रस्ते कामांना स्थगिती दिल्यानंतर धाराशिव येथे आता रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. खराब रस्त्याने त्रस्त झालेले महिला, नागरिक ह्या रस्त्यावर उतरणार असुन साखळी उपोषण आंदोलन करणार आहेत. भाजप पक्षाने या आंदोलनाची मोठी तयारी केली असुन वाद चिघळणार आहे. अजमेरा या ठेकेदार याला काम मिळावे यावरून रणकंद सुरु आहे, जनतेतील आक्रोश दाखवीत सरकारला खिंडीत पकडले जाणार आहे. तक्रारीनंतर फडणवीस सरकारने स्थगिती देत अहवाल मागवला आहे.
धाराशिव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आम्हा नागरिकांना दररोजचा त्रास बनली आहे. घराबाहेर पडताना मुलांना शाळेत पाठवताना, बाजारात जाताना, रुग्णांना दवाखान्यात नेताना प्रत्येक पावलागणिक खड्डेच खड्डे.परिणामी अपघात व पाठीचे विकार,असह्य त्रास.आता रस्त्यांची दुरुस्ती सुरू होताच, तीही राजकीय कारणांनी थांबवली, जर तातडीने ती उठवली नाही तर उद्यापासून आम्ही उपोषणाला बसणार असा इशारा धाराशिव शहरातील महिलांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बुधवार 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवून देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 140 कोटींच्या नगरोत्थान योजनेतून आमच्या रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या कामांना 28 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली, पण त्याच दिवशी स्थगिती ही बाब अतिशय अन्यायकारक असून जनतेच्या जीविताशी व आरोग्याशी खेळणाऱ्याना आम्ही आता गप्प बसणार नाही.
जर रस्त्यांवरील स्थगिती तात्काळ उठवली नाही,जर नागरिकांच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष होत राहिलं,तर शहरातील महिला वर्गच रस्त्यावर उतरेल!उपोषण, आंदोलन, निदर्शने सर्व काही करण्यास आम्ही तयार आहोत.आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.धाराशिवच्या विकासाला अडथळा आणणाऱ्यांना महिला वर्ग उत्तर देईल ते ही रस्त्यावरूनच असा ईशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर धाराशिव शहरातील महिला सुजाता प्रकाश पवार,सुषमा चंद्रकांत पवार, अनसूया बाळू माने,राजकन्या संदीप पवार , कमल सागर चव्हाण ,वंदना दिलीप डोके, शर्मिला सलगर ,विद्या इंगळे, छाया लाटे, शिवानी परदेशी, वर्षा युवराज नळे , सुनिता वाघचौरे, रंजना गुरव, भाग्यश्री इंगळे, रुक्मिणी पिराजी मंजुळे, वैशाली सुशांत सोनवणे, रूपाली विठ्ठल गाटे, कोमल गणेश पवार, कविता धनराज घुले, हिना शेख, महादेवी बाळासाहेब तानवडे, कोमल किरण काकडे, नेहा राहुल काकडे, नागरबाई रामा गुंडरे , सुनंदा हरिभाऊ काकडे यांच्या सह आदी महिलांच्या सह्या आहेत.












