धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शहापुर जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कचरू मल्हारी सगट यांना 2 वर्षासाठी धाराशिव, लातुर व सोलापूर या 3 जिल्ह्यातुन हद्दपार करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीवर उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडे सुनावणी पार पडली असुन निर्णयाकडे लक्ष लागले आहे. उद्या 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदसाठी मतदान होणार आहे.
पोलिस विभागाचा अहवाल व नोटीसीमुळे सगट यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. शहापुर जिल्हा परिषद गट हा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला असुन इथे गुन्हेगारी पार्शवभुमी असलेले उमेदवार शिवसेना शिंदे व शिवसेना उबाठा गटाने दिले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1)(ब) नुसार सगट याला धाराशिव, सोलापूर, लातूर या जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार करण्याची शिफारस तुळजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी केली होती, उपविभागीय अधिकारी यांनी 16 जानेवारी रोजी नोटीस काढुन सुनावणी घेतली त्यानंतर त्यांनी हद्दपारीचे आदेश पारित केले. सगट याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न 307, दरोडा 395, शासकीय कामात अडथळा 353 या 3 गुन्ह्यांसह 5 अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत.
सगट याच्यावर सीआरपीसी 110 व पोलिस स्टेशन नळदुर्गने चॅप्टर कलम 129 अन्वये कारवाई करण्यात आली तरीही वर्तनात काही एक सुधारणा झाल्याचे दिसुन येत नाही त्यामुळे काटगाव व परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे पोलिस अहवालात म्हटले आहे. आपणा विरुध्द सामान्य माणुस उघडपणे साक्ष देण्यास धजावत नाहीत. तरी आपण शरीराविरूध्दचे व मालमत्तेविषयीचे गंभीर गुन्हे करून शांतता व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन हद्दपारीची कारवाई करावी असा प्रस्ताव पाठवला आहे.
शहापुर जिल्हा परिषद गटात अशोक जाधव राष्ट्रवादी शरद पवार गट, कचरू सगट शिवसेना उबाठा गट, सुनील बनसोडे शिवसेना शिंदे गट व लिंगय्या स्वामी हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुळजापूर तालुक्यात शिवसेना भाजपा युती असुन केवळ एक जागा शिवसेना शिंदे गटाला दिली असुन त्या जागेवर भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे राज्य जनरल सेक्रेटरी सुनील बनसोडे याला उमेदवारी दिली आहे. बनसोडे हा पुणे येथील मारणे टोळीचा ‘शार्प शुटर’ व ‘टॉप हॅन्ड’ म्हणुन ओळखला जात असुन मकोकासह अनेक गुन्हे नोंद आहेत.









