मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल नाही घेतली तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही
तुळजापूरातील मराठा ठोक मोर्चाच्या चिंतन बैठकीत सरकारसह लोकप्रतिनिधीना सज्जड दम
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
मराठा आरक्षण मुद्यावर आता खेळ नको आहे,आम्ही आता जो निर्णय घेऊ तो शासनाला परवडणारा नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाची दखल नाही घेतली तर कोणतेही सरकार महाराष्ट्रावर राज्य करणार नाही असा सज्जड दम मराठा मोर्चाच्या चिंतन बैठकीत देण्यात आला. जे आमदार खासदार मराठा समाजाला मदत करीत नाहीत हेटाळणी करतात त्यांना यापुढे विचार करावा लागेल.
मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री आमदार खासदार असताना मराठा आरक्षण बाबत समाजावर अन्याय का झाला ? का कोणी केला ? याचा शोध उद्याच्या राज्यव्यापी बैठकीत घेतला जाणार असून त्याचे पडसाद पुन्हा राज्यभर पाहायला मिळतील असा इशारा आयोजक सज्जन साळुंके यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी मूक मोर्च्याच्या ऐवजी ठोक मोर्चे निघतील असे दिसते. तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत मराठा समाजाच्या बैठकीत ठोक मोर्च्याचे टोप्या परिधान केल्या होत्या, यामुळे आगामी काळात मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक होणार असंच दिसतंय.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची चिंतन बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये मोर्च्याचे राज्यातील विविध समन्वयक उपस्थित होते. जवळपास दोन तास चाललेल्याया बैठकीमध्ये विविध ठराव घेण्यात आले. या ठरावाची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय उद्या राज्यस्तरीय मेळाव्यात घेण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.