निर्वाणीचा इशारा – जिल्हाधिकारी सतर्क, नियमानुसार प्रकरणे तात्काळ निकाली काढणार
भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास थेट गंभीर प्रशासकीय व फौजदारी कारवाई
नागरिकांना कामाची अपेक्षा तर भ्रष्टाचारमुक्त प्रशासनावर व कार्यपद्धती जिल्हाधिकारी यांचा भर
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असणा-या प्रकरणात नियमानुसार पात्र आढळणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येणार आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही कामासाठी शासकीय कर्मचारी, एजंट, खाजगी व्यक्ती यांनी पैशाची मागणी केल्यास ही बाब जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या निदर्शनास आणून दयावी. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या ombasesachin@gmail.com व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे shivkumarswamitm@gmail.com या वैयक्तीक ई-मेल आयडीवर माहिती देण्यात यावी.माहिती देणा-या व्यक्तीची नाव उघड करण्यात येणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त पुरवठा,भूसंपादन, रोहयो,नगर पालिका प्रशासन,पुनर्वसन,नियोजन, महसूल व निवडणूक या विभागातून प्रशासकीय कामकाज चालतात.भूसंपादन विभागातून शेतकर्यांचा मोबदला वितरीत करणे,संपादित केलेल्या जमीनीचे अपील प्रकरणे,वाढीव मावेजेच्या अनुषंगाने दाखल केलेली अपील प्रकरणे महसूल शाखेकडून,नवीन शस्त्र परवाना मंजूर करणे,विस्फोटक नियमानुसार नवीन परवाना, नाहरकत प्रमाणपत्र देणे,औद्योगिक अकृषि परवानगी देणे, शासकीय जमीन प्रदान करणे,गौण खनिज परवाना देणे बाबी हातळल्या जातात,पुरवठा विभागातून विविध योजनेचा लाभ मंजूर करण्याची कार्यवाही केली जाते.
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क उस्मानाबाद या विभागातून देशी व विदेशी मद्द विक्रीच्या परवानगी दिली जाते व सदरील परवानगी ही जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने दिली जाते त्या अनुषंगाने जिल्हयातून प्राप्त होणा-या नवीन मद्दय विक्रीचे प्रस्ताव हे संबंधित अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग उस्मानाबाद यांचे कडून हातळली जातात. तसेच ज्यांना परवाने निर्गमित करण्यात आलेली आहेत अशा देखील प्रकरणात अपील प्रकरणे जिल्हाधिकारी यांचेकडे चालविले जातात.
भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास थेट गंभीर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी सांगितले आहे.











