पक्ष कोणाचा मालकीचा नाही, श्रेयवादावरून टीका – जनता घोषणाना कंटाळली, सन्मानाची वागणुकीवर एकत्र
धाराशिव – समय सारथी
धाराशिव,लातूर व बीड विधान परिषद निवडणुकीत बसवराज पाटील यांनी मिळविलेल्या विक्रमी विजयाबद्दल भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रूपामाता समुहाचे संस्थापक अध्यक्ष ऍड व्यंकटराव गुंड यांनी रूपामाता परिवाराच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांच्या हस्ते नागरी सत्कार संपन्न झाला. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपातील नाराज गट एकत्र झाल्याचे दिसले. गुंड, काळे, ठाकूर, ओमराजे यांच्यासह बसवराज पाटील यांनी योगदान व सन्मानाच्या वागणुकीवर एकी दाखवली, यानिमित्ताने मैत्री घट्ट झाली. श्रेयवाद व पोकळ घोषणा यावरून टीका करीत पक्ष कोणा एकाच्या मालकीचा नसल्याचा सुर आवळण्यात आला.
खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, वकील संघांचे अध्यक्ष ऍड खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, कोंडाप्पा कोरे, जनता बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे, शिवसेनेचे संघटक सुधीर पाटील, सहसंपर्क प्रमुख सुरज साळुंके, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड अनिल काळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामदास कोळगे, भीमाशंकर हासूरे, प्रकाश आष्टे, रामेश्वर शेटे यासह मान्यवर उपस्थितीत होते.
नागरी सत्कार निमित्त बसवराज पाटील यांनी रूपामाता परिवार व ऍड गुंड यांचे आभार मानले. आजच्या सत्कारामुळे प्रेरणा, ऊर्जा मिळालीच त्याच बरोबर जबाबदारी सुद्धा वाढली. समाजकारण व राजकारण करीत असताना सकारात्मक विचाराने पुढे गेले पाहिजे. ही मैत्री लोकांसाठी, जनतेच्या सेवेसाठी, हितासाठी असुन पुढील काळात मैत्री अधिक घट्ट करू असे ते म्हणाले. 35 वर्ष कामे केलेल्या लोकांचे योगदान मोठे व खरे आहे, आई वडिलांपेक्षा त्यांनी पक्षांवर जास्त प्रेम केले हा इतिहास आहे.अश्या लोकांसोबत काम करणे आमचे नशीब आहे. आम्ही कसे वागावे यापेक्षा तुम्ही आम्हाला चांगले वागवत आहोत यासाठी मनापासून आभार मानले. तुमचे योगदान, काम व मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही आम्हाला समावून घेतले. मन मोठे आहे म्हणुन भाजप देशात 1 नंबर आहे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सगळ्यांची गरज आहे. मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देऊ असे आश्वासन दिले.
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, बसवराज पाटील यांच्या रूपाने भाजपाला एक कार्यक्षम, शांत, मितभाषी, अनुभवी, सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व मिळाले आहे. सामान्य कार्यकर्ता भाजपचा आधार असुन कार्यकर्ते यांनी चिंता करण्याची गरज नाही, निश्चित रहा. हा पक्ष कोण्या एका कुटुंबाच्या मालकीचा नाही. शाखा अध्यक्ष पासून जिल्हा, प्रदेश, राष्ट्रीय अध्यक्ष त्याला दर 3 वर्षांनी पदावरून पायउतार व्हावे लागते, अशी रचना आहे कारण पक्षाची सुत्रे कोणा एका व्यक्तीकडे राहता कामा नये. कोणी कसे वागले तरी चालणार नाही, हा या पक्षाचा इतिहास आहे.
कृष्णा मराठवाडा, वैद्यकीय महाविद्यालय, रेल्वे हे विषय मार्गी लावले, मी श्रेयवादाचे राजकारण केले नाही. 2014 साली मोदी यांच्या दौऱ्यांची जबाबदारी दिली होती, तुळजापूर येथे सभा घेतली. मी भाषणात तुळजापूर रेल्वेचा विषय मांडला, नंतर त्यांनी घोषणा केली, मी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला. माझ्या घरात कोणीही राजकारणात नसताना अनेक जबाबदाऱ्या न मागता देत आमदार केले. महाआरोग्य शिबीर वेळी गिरीश महाजन यांना वैद्यकीय महाविद्यालय विषय मांडला. महाजनादेश यात्रा सुरु असताना मुख्यमंत्री यांच्याकडुन वैद्यकीय महाविद्यालय संचिकेवर चालत्या गाडीत सही केली. टेक्स्टईल पार्क, कृष्णा पाणी यावर ही आवाज उठवला.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता नव्हती, बिन पाण्याची योजना होती. श्रेय घेणाऱ्यांत धमक असेल तर 7 टीएमसी पाणी आना नागरी सत्कार करू असे आवाहन केले. नीरा भीमा व जेऊर बोगद्याची कामांना मान्यता मिळवली, निधी तरतूद करून उपलब्ध केला. राज्यपाल यांना विनंती करणारा ठराव करून घेतला. मी श्रेयाचे राजकारण केले नाही, अध्यात्मिक कुटुंबातील असल्याने माझे अंतर्मन सांगेल मी काम केले. धाराशिव मागासलेला जिल्हा राहणार नाही असे ठाकूर म्हणाले.
आपण पुढच्याला सन्मान दिला तर तो आपल्याला सन्मान देतो. मागितल्याने सन्मान मिळत नाही, सन्मान मिळावा यासाठी झिजावे लागते. मी निवडून आल्यावर कोणालाही पक्ष न विचारता जनतेची कामे केली, त्याच पद्धतीने काम करीत राहील. मी आल्याचा भाजपच्या लोकांना आनंद झाला, आपलं कोणी तरी आले. 1995 साली कोणालाही वाटतं नव्हते भाजपची सत्ता येईल, संघर्ष केला, लाठ्या काठ्या खाल्ल्या. त्यामुळे पाठीमागून कोणीही आले तरी तुमचे स्थान उच्च दर्जाचे आहे. जुना नवा वाद पेक्षा मान देणे जबाबदारी आहे. हम करे सो कायदा, मीच मालक म्हणुन चालणार नाही व चालुही देऊ नये या मताचा मी आहे असे खासदार ओमराजे म्हणाले. ओमराजे यांनी बसवराज पाटील यांना मंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. श्रेय जरूर घ्यावे मात्र त्यासाठी काय कष्ट केले ते सांगावे असे ते म्हणाले.
डीपीची किंमत काय असते हे शेतकऱ्याला असते, जेव्हा त्याचे पीक डोळ्यादेखत वाळते. अनेकांनी डीपीवर जोक केले त्यांना काही बोलणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणुन जबाबदारी पार पाडली. काम होत नसल्याने निर्णय घेतला या पक्षात आल्यावर 33 कोटींचा निधी आणला, यातून सामान्य लोकांची कामे होणार आहेत. केंद्रीय विद्यालय बाबतीत मी प्रश्न उपस्थितीत केला, पाहणी पथक आले की सत्कार करून श्रेय घेतले. काही जण दुसऱ्याचे श्रेय घेतात त्याला जनता कंटाळली आहे. काहींनी कारखान्यासाठी जमिनी घेतल्या, चिमणी उभी केली. प्रेस नोट देऊन श्रेय घेतले जाते. उद्यानासाठीचा निधी यांनीच अडवला व नंतर श्रेय घेतले याची कीव येते, तुळजाभवानीने त्यांना सद्बुद्धी द्यावी असे ओमराजे म्हणाले.
14 मंडळाना पीक विमा मिळाला नाही. अतिवृष्टीची अट समाविष्ट होती ती अट घ्यावी अशी मागणी केली आहे. ट्रिगरचा समावेश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा प्रण केला. कृष्णा मराठवाडा प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्प म्हणुन मान्यता मिळाल्यास केंद्राचा निधी येईल. रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ओमराजे म्हणाले. आम्हाला विचारत नव्हते तुम्ही आलात बरे झाले असे त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कार्यकर्ते यांची किमंत व जनतेची ताकत त्यांना कळू लागली ही एक चांगली चाहूल आहे असे ओमराजे म्हणाले.
ऍड व्यंकटराव गुंड म्हणाले की, बसवराज पाटील राजकीय प्रवास आमदार ते मंत्री असा असुन त्यांना काही लोकांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ दिले नाही मात्र ते त्याच खात्याचे मंत्री झाले. संयमी, शांत नेतृत्व असुन कार्यकर्ते यांना मान सन्मान, प्रेम देणारे व समस्या सोडविणारे आदर्शवत नेतृत्व आहे. काही मंडळी अशी असतात की त्यांचे फोन त्यांचे खासगी सहाय्यक उचलतात. पाटील यांना पक्ष मंत्री म्हणुन नामदार करेल. सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात त्यांचे काम उत्कृष्ट असुन त्यांनी औसा येथे मोठी विकास कामे केली. रूपामाता हे नाव आईच्या वरून ठेवले असुन सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात सामाजिक भान ठेवून काम करीत असुन यशोगाथा मांडली.
ऍड अनिल काळे म्हणाले की, जिल्ह्यात अनेकांनी पोकळ घोषणा केल्या मात्र कृष्णा मराठवाडा पाणी, मेडिकल कॉलेजबाबत ठाकूर यांनी पाठपुरावा केला, त्याबद्दल आभार मानले. सामान्य कार्यकर्तेमध्ये मिसळून जाणारे बसवराज पाटील यांचे व्यक्तिमत्व आहे, 1995 पासून त्यांचे कार्य सुरु आहे. 35 वर्षांपासून आम्ही वारे, वादळात भाजपात काम करतो, त्यांना आज सावली मिळत नाही. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही लहान असल्यापासून ओळखतो, त्यांच्या नेतृत्वात तळागाळापर्यंत काम करू असे काळे म्हणाले.











