द्वेषापोटी तक्रार – त्रुटीकडे लक्ष, माझी फक्त ओळख, आरोप अमान्य – सर्व विश्वस्त ‘असेच’ करतात
धाराशिव – समय सारथी
सोलापूर येथील तडीपार सराईत गुंड मटका किंग अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे यांच्या तुळजाभवानी गाभारा प्रवेश व फोटोसेशन प्रकरणी तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांना जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गंगणे यांचे तुळजाभवानी मंदीर संस्थांनाचे विश्वस्त म्हणुन असलेले सदस्यत्व का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस देत 48 तासात खुलासा देण्याचे आदेशीत केले होते त्यावर गंगणे यांनी खुलासा सादर केला आहे.
नोटीस ही वस्तुस्थिती व कायद्याच्या विरुद्ध असल्याने मान्य व कबूल नाही. नोटीस ही अमरराजे परमेश्वर कदम यांच्या निवेदनावरून देण्यात आली असुन निवेदनाची प्रत सदर नोटीस बरोबर देण्यात आलेली नाही. सदर बाब नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरुद्ध आहे. नोटीसमध्ये नमूद केलेले सीसीटीव्ही फुटेज त्याची देखील प्रत सदर नोटीस बरोबर देण्यात आलेली नाही, त्यामुळे त्यास खुलासा मागविणे देखील नैसर्गिक न्याय तत्वाचा उल्लंघन आहे. निवेदन मिळाल्यानंतर व सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर अधिकचा खुलासा देण्याचा अधिकार राखून ठेवून म्हणणे सादर केले आहे.
अमर राजे यांनी दिलेले निवेदन संपूर्णपणे खोटे असून केवळ ते राजकीय व व्यक्तिगत द्वेषापोटी, कोणतीही माहिती न घेता दिलेले आहे. गंगणे यांनी विश्वस्त व नगराध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी, परिपूर्णरित्या, प्रामाणिकपणे, मंदिरातील नियम व शिस्तीने पालन करूनच पार पाडलेली आहे व यापुढेही पार पाडणार आहेत असे उत्तरात नमुद केले आहे.
13 ऑक्टोबर रोजी मंगळवारी ज्या व्यक्तींनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले,सदर व्यक्ती माझ्या ओळखीच्या होत्या इथपर्यंतची बाब खरी आहे परंतु त्यामधील इतर बाबी मान्य नाहीत. मी पदाचा गैरवापर करून गाभाऱ्यात सोडले नाही, कोणत्याही कर्मचाऱ्याला त्यांना गाभाऱ्यात सोडण्याबाबत आदेशित केले नाही किंवा विनंती ही केली नाही. ते माझ्या ओळखीचे असल्याने मी फक्त त्यांना बोललो परंतु त्यांना गाभाऱ्यात सोडा अशी कोणालाही मी विनंती केली नाही.
मी विश्वस्त व नगराध्यक्ष म्हणून दर्शनासाठी माझ्या कुटुंबासह गाभाऱ्यामध्ये गेलेलो होतो. माझी पत्नी देखील नगरपरिषदेची नगराध्यक्षा व विश्वस्त राहिलेली आहे. ते गाभाऱ्यात जात असताना संबंधित कर्मचारी यांनी त्यांना प्रतिबंध करणे ही त्यांची जबाबदारी होती. त्यांना थांबवले नाही, थांबवले असते तर मी त्यांना सोडाही म्हटले नसते. त्यामुळे केवळ चलचित्र पाहून नको तो तर्क लावून खोट्या पद्धतीने तक्रार दिल्याचे गंगणे यांनी म्हणटले आहे.
श्री देवीच्या अभिषेक पूजेनंतर कोणीही इतर व्यक्ती भाविक यांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यास मनाई असल्याचा नियम आहे. असे नोटीसीत नमुद केले आहे. सदर नियम अद्याप पर्यंत मला कोणीही दाखवलेला नव्हता. मला माहिती नाही, माझ्या अज्ञानपणामुळे मी दर्शनास गेलो असेल त्या अनुषंगाने काही चूक झाली असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु अशा प्रकारचा कोणता नियम आहे असे माझे आतापर्यंत निदर्शनास आले नाही.
अज्ञानामधून सदर कृती घडलेली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. समाज माध्यमावर त्याचे पडसाद उमटले वगैरे वगैरे समाज माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावून सदर निवेदनाच्या आधारे सदरची बातमी केल्याची दिसून येते. माझी बाजू त्यामध्ये विचारात घेतलेली नाही. एकतर्फी बातमी समाज माध्यमाने लावलेली दिसून येते. त्यामुळे वस्तुस्थिती आणि समाज माध्यमावर आलेली परिस्थिती ही संपूर्णपणे वेगवेगळी आहे तरी परंतु याबाबत अध्यक्ष यांना असे वाटत असेल की यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांची नाहक बदनामी झाली तर त्या अनुषंगाने मी दिलगिरी व्यक्त करतो.
मंदिरमध्ये सर्वच विश्वस्त अशा पद्धतीने पूजा करत आलेले आहेत. त्यामुळे अज्ञानातून केवळ दर्शन केले म्हणून विश्वस्त पद रद्द करण्यापर्यंतच्या नोटीसला काहीही कायदेशीर तथा वस्तु स्थितीचा आधार नाही ही बाब स्पष्ट आहे. तरी परंतु यापुढे मी या अनुषंगाने निश्चित मंदिरच्या अध्यक्षांना निवेदन देऊन सर्व माहिती मागून घेऊन मी ही पालन करेल आणि इतर वेळी या नियमाच्या अनुषंगाने किंवा या नियमाची झालेली अवेलना बाबत आपल्या निदर्शनास एवढ्याच तत्परतेने मी देखील या बाबी आणि मंदिरचे हित जोपासण्याचा परिपूर्णरित्या जबाबदारी पूर्वक प्रयत्न करेन असे म्हण्टले आहे.











