धाराशिव – समय सारथी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरून दरवर्षीप्रमाणे स्वच्छता ही सेवा 2024 ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींनी राबवावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांनी केले. यावर्षीच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेसाठी ‘स्वभाव स्वच्छता’, ‘संस्कार स्वच्छता’ही थीम निश्चित केली आहे.या मोहिमेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
17 सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल, 18 सप्टेंबरला सफाईमित्र सुरक्षा शिबिर घेण्यात येणार असून सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे लाभ देण्यात येईल, 19 सप्टेंबरला अस्वच्छ ठिकाणांची कायमस्वरूपी स्वच्छता करण्यात येणार आहे, 20 सप्टेंबरला गावातील खाऊ गल्लीच्या ठिकाणी निघणाऱ्या कचऱ्यांची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात येणार आहे, 21 सप्टेंबरला संस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात येणार आहे, 22 सप्टेंबरला एकल प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जनजागृती, 23 सप्टेंबरला गृहभेटीद्वारे जनजागृती करून ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, 24 सप्टेंबरला तालुकास्तरावर स्वच्छता ज्योत, मॅरेथॉन सायकल मॅरेथॉन,स्वच्छता रॅली, मानवी साखळी, 25 सप्टेंबरला शाळा व महाविद्यालयात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्पर्धा, 26 सप्टेंबरला सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती होणार आहे.
27 सप्टेंबरला ग्रामपंचायत स्वच्छ वार्ड स्पर्धा,28 सप्टेंबरला वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खतखड्डा व शोषखड्डा निर्मिती करणे, 29 सप्टेंबरला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करणे, 30 सप्टेंबरला स्वच्छतेची वाहने व उपकरणांची स्वच्छता व सुशोभीकरण करणे, 01 ऑक्टोबरला स्वच्छता प्रतिज्ञा तर 2 ऑक्टोबरला स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे या अभियानात ग्रामपंचायतीसह गावातील सर्व शाळा,अंगणवाडी,शासकीय कार्यालये, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन ही मोहीम यशस्वीपणे राबवावी असे आव्हान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, प्रकल्प संचालिका श्रीमती प्रांजल शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) श्याम गोडभरले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल ताकभाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) देवदत्त गिरी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिवाजी पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंखे यांनी केले आहे.
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत दिनांक 19 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ‘एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी’ महाश्रमदान करण्यात येणार आहे.धाराशिव जिल्ह्यातील सर्व गावांनी यात सहभागी होऊन सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत श्रमदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यात स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी,शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक- युवती, सेवाभावी संस्था,समाजसेवक, महिला बचत गट यांचा सहभाग राहणार आहे.या ‘महाश्रदानात’ प्राधान्याने धार्मिक,अध्यात्मिक स्थळे,पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू,संस्थात्मक इमारती, वारसा स्थळे, नदी किनारे, कार्यालय, व्यावसायिक व बाजारपेठ आदी परिसरात स्वच्छता करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.