अभियान राबविणारा धाराशिव देशातील पहिला जिल्हा – पालकमंत्री डॉ सावंतांचा पुढाकार
धाराशिव – समय सारथी
गाव तिथे स्मशानभुमी व दफनभुमी हे अभियान धाराशिव जिल्ह्यात राबविल्याने स्मशानभुमी व दफनभुमीचे वाद मिटले असुन अखेरचा प्रवास तंटामुक्त झाला आहे. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतला असुन हे अभियान राबविणारा धाराशिव हा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. ग्रामस्थाच्या मागणीनुसार स्मशानभुमी व दफनभुमी देण्यात आली शिवाय तिथे सुविधासाठी निधीही देण्यात आल्याने शेड, गार्डन व इतर व्यवस्था करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भुम, परंडा, वाशी यासह अन्य तालुक्यातील अनेक गावांचा स्मशानभुमी व दफनभूमीचा प्रश्न कायमचा मिटला आहे. हिंदु मुस्लिम धर्मासह अन्य समाजाच्या लोकांना मागणीनुसार स्वतंत्र स्मशानभुमी मंजुर करण्यात आली. ग्रामीण भागात अनेक वेळा कायमची स्मशानभुमी नसल्याने वाद, तंटे होत असत, अखेरचा प्रवासही वादग्रस्त ठरत असल्याने गावात एकमेकात कायम वितुष्ट येत असत व सामाजिक वातावरण तणावाचे बनत, अनेक वेळा हा वाद विकोपाला जाऊन हाणामारी व पोलिसात गुन्हे देखील नोंद होत. अश्या अनेक तक्रारी आल्यानंतर पालकमंत्री डॉ सावंत यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला त्यावेळी असे लक्षात आले की अनेक गावात स्मशान, दफनभुमी नाही.
ज्या ठिकाणी स्मशानभुमी, दफनभुमीला जागा नाही त्या ठिकाणी नागरिकांना जागा देण्याचे आवाहन केले, जिथे ग्रामपंचायत, गावठाण जमीन आहे ती घेण्यात आली व जिथे काहीच पर्याय नाही त्या ठिकाणी थेट खरेदीने भुसंपादन करीत जमीन उपलब्ध करुन देण्यात आली. या ठिकाणी कामे मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर उपलब्ध असलेल्या योजनाचा सुयोग्य मेळ घालत व लोकसहभागातून नियोजन केले गेले, त्यामुळे अनेक गावातील स्मशान व दफनभूमीचा प्रश्न कायमचा मिटला आहे, धाराशिव जिल्ह्याचा हा उपक्रम अनुकरणीय असाच ठरला आहे.