धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 7 आरोपींच्या जामीन अर्जावर आज 28 एप्रिल रोजी पोलिस व सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार असुन धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. आरोपींच्या वतीने ऍड अंगद पवार, ऍड रामेश्वर सुर्यवंशी, ऍड विशाल साखरे यांनी युक्तिवाद सादर केला त्यावर जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे प्रतिउत्तर दाखल करतील.
धाराशिव कारागृहातील आरोपी संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे यांनी अटकपूर्व असे 7 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात 36 आरोपी असुन 14 जेलमध्ये तर 22 फरार आहेत, पोलिसांचा शोध सुरू असुन फरार राहण्यात आरोपी यशस्वी ठरत आहेत.
परंडा येथे 19 जानेवारी 2024 रोजी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी क समरी अहवाल दाखल केला असुन त्यावर कोर्ट 3 मे 2025 ला निकाल देणार आहे. कोर्ट पोलिसांचा अहवाल स्वीकारणार की फेटाळणार हे स्पष्ट होणार आहे. परंडा प्रकरणात ड्रग्ज पकडण्यात आल्यानंतर प्रयोगशाळा तपासणीत ते कॅल्शियम क्लोराईड सापडले होते, त्यानंतर गुन्हा गैरसमजुतीतुन दाखल झाल्याचा निष्कर्ष काढत गुन्हा रद्द करावा असा लेखी अहवाल 19 मार्च 2025 रोजी दिला, यात 2 आरोपीना अटक केली होती. या प्रकरणात 24 एप्रिल 25 रोजी सुनावणी झाली आहे.
परंडा प्रकरणाची सखोल चौकशी करावी व ती केस मागे घेऊ नये तसेच परंडा शहरात मोठ्या प्रमाणात गावठी पिस्टल आल्या आहेत त्याचा व ड्रग्ज तस्करी रॅकेटचा शोध घेण्यात यावा आशी मागणी भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत केली होती, याबाबत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस अधिक्षक संजय जाधव यांची भेट देखील घेणार आहेत.
बार्शी येथील ड्रग्ज तस्करीत 12 पैकी अटकेतील 7 आरोपीची पोलिस कोठडी 28 एप्रिल रोजी संपणार असुन त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे, कोर्टाने 3 वेळेस कोठडी दिली आहे. परंडा ड्रग्ज तस्करीतील ‘बोका’ असलेल्या मस्तानला अखेर पोलिसांनी आरोपी केले असुन त्याचा ‘आका’ कोण याचा शोध सुरु आहे. परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर,हसन चाऊस, दीपक काळे, साजिद चाँद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख व शेळके नावाच्या अश्या 9 जणांना आरोपी केली आहे त्यातील मुजावर, शेख व शेळके हे फरार आहेत. बार्शी येथील अय्याज शौकत शेख,जमीर अन्सार पटेल व सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख हे 3 आरोपी बार्शी येथील आहेत.