धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल 10 हजार 744 पानाचे दोषारोप/चार्जशीट दाखल केले असुन त्यात त्यांनी 36 पैकी 26 आरोपीना ड्रग्ज तस्कर तर 10 आरोपीना व्यसनी असल्याचा ठपका ठेवला आहे. एकाच दिवशी तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांचे ड्रग्ज आरोपी विनोद उर्फ पिटू विलास गंगणे यांनी खरेदी केल्याचे चार्जशीटमधील जबाबानुसार समोर आले आहे. विशेष म्हणजे हे खरेदी करताना त्यांनी जवळच्या नातेवाईक यांच्या फोन पे वरून ही रक्कम ड्रग्ज तस्करांना पाठवली आहे. गंगणे यांनी ड्रग्ज प्रकरणात दुसऱ्याचा मोबाईल, फोन पे व इतर यंत्रणा वापरली थोडक्यात शांत डोक्याने (Cold Blooded crime) त्यांनी हा गुन्हेगारी कट रचला. शांत डोक्याने योजना आखत लाखोंचे ड्रग्ज खरेदी करणारा ‘व्यसनी’ आणि इतर आरोपी ड्रग्ज ‘तस्कर’ त्यामुळे ‘अजब तुझे सरकार’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी 25 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या नात्यातील 2 व्यक्तींना त्यांच्या फोन पे वरून मुंबई येथील ड्रग्ज तस्कराच्या खात्यावर पैसे टाकायला सांगितले व त्यांना ती रक्कम रोख दिली. एका व्यक्तीने दिलेल्या जबाबानुसार त्याला 25 ऑगस्ट रोजी 40 हजार, 45 हजार व 20 हजार असे 1 लाख 5 हजार टाकायला लावले, त्याचं दिवशी एका व्यापारी मित्राला ड्रग्ज तस्कराच्या खात्यावर 20 हजार टाकायला लावले. असे 25 ऑगस्ट रोजी 1 लाख 25 हजार टाकायला लावले. गंगणे हे मुंबई येथील तस्करांच्या थेट संपर्कात होते, त्याचे पुरावे आहेत. 3 ते 5 हजार रुपये प्रति ग्रॅम ड्रग्जचा दर आहे, त्याप्रमाणे गंगणे यांनी एकाच दिवशी 25 ते 40 पुड्या ड्रग्ज खरेदी केले व त्याची साठवणुक केली. (ड्रग्ज साठवणे व बाळगणे गुन्हा आहे) इतका मोठा ड्रग्ज साठा व्यसनासाठी असतो की विक्रीसाठी ? ते ड्रग्ज तुळजापूरपर्यंत कसे व कोणी आणले हा तपासाचा भाग आहे. एक दिवस आपणं अडकू शकतो म्हणुन पर्याप्त काळजी घेऊन केलेले हे ड्रग्ज व्यसन वजा गुन्हा आहे.
पिटू गंगणे यांनी इतर अनेक लोकांच्या सोबतच स्वतःचे बंधु विजय गंगणे यांचा सुद्धा वापर केला, विजय गंगणे यांच्या खात्यावरून 30 सप्टेंबर 24 रोजी 18 हजार ड्रग्ज तस्कराच्या खात्यावर टाकले, पोलिसांनी जेव्हा नोटीसा दिल्या तेव्हा ही बाब समोर आली आहे. पिटू गंगणे हे समाजसेवा करीत असल्याने वेळोवेळी ते लोकांना पैसे देत म्हणुन आपणं 18 हजार टाकले असे विजय गंगणे यांच्या जबाबात नमुद आहे. पिटू गंगणे यांनी शांत डोक्याने कट रचत ड्रग्जचे सेवन केले त्यासाठी त्यांनी इतरांचा वापर केला हाही एक गंभीर गुन्ह्याचा व गुन्हेगारी मानसिकतेचा प्रकार आहे. गंगणे यांच्या बाबतीत ज्याच्या खात्याचा फोनचा वापर झाला त्यांना साक्षीदार बनवले असुन बहुतांश जबाब हे कॉपी पेस्ट म्हणजे एक सारखेच वाक्यरचनेचे आहेत, जसे की सगळे जन जबाब तोंडपाठ करून आलेत.
ड्रग्ज तस्कर गटातील जवळपास सगळ्यांचे पुरावे सारखे आहेत. फोन पे, कॉल व एसएमएस डिटेल याचा समावेश आहे, मात्र केवळ पोलिसांना टीप दिली म्हणुन त्यांचा समावेश व्यसनी गटात केल्याचा आरोप इतर आरोपीचे नातेवाईक करीत आहेत. सगळे एकत्र करीत होते मग हा दुजाभाव का? असे ते म्हणत आहेत. पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करीत कागदपत्रे जमा केली आहेत, मात्र 2 गट करीत गंगणे यांना व्यसनी गटात आरोपी केले आहे त्यामुळे चर्चा होत आहे.
घटनाक्रम – पिटू गंगणे यांनी ड्रग्जचे व्यसन केले त्यांनी अनेक मित्रांना त्याची सवय लावली व त्यानंतर त्यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नेरुळ येथे उपचारासाठी पाठवले व नंतर बडोदा गुजरात येथे ते गेल्यावर व्यसनमुक्त झाले. पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी ड्रग्ज तस्करी बाबत पोलिसांना टीप देत आरोपीना पकडून दिले, त्यापूर्वी त्यांनी जानेवारी 25 या महिन्यात स्वतःच्या खात्यावरून 6 वेळेस व्यवहार करीत 95 हजार पाठवून ड्रग्ज तस्कर व तुळजापूर येथील स्थानिक पेडलर यांचा विश्वास जिंकला, हे सगळे 1 महिने चालले. ज्यांनी माहिती दिली त्यांच्या बद्दल तुम्हा सर्वांची आदराची, उपकृत भावना असायला हवी, त्यांनी माहिती दिली ही साधी गोष्ट नाही ना? असे आमदार पाटील यांनी म्हण्टले आहे. त्यांच्या आवाहनप्रमाणे लोक नागरी सत्कार करुन जाहीर आभार मानतीलही पण आजवर केलेल्या गुन्ह्यांचे व बाबींचे काय? असाही प्रश्न आहे.
ड्रग्ज तस्कर गटातील 26 आरोपी – मुंबई येथील तस्कर संगीता वैभव गोळे, वैभव अरविंद गोळे, संतोष अशोक खोत, जीवन नागनाथ साळुंखे, अमित अशोक आरगडे, युवराज देविदास दळवी, संदीप संजय राठोड, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी शाहूराज चव्हाण, ऋतुराज सोमनाथ गाडे, सुमित सुरेश शिंदे, संकेत अनिल शिंदे, प्रसाद उर्फ गोटन कदम, राहुल सुनील कदम, गजानन उर्फ हंग्या प्रदीप हंगरगेकर, स्वराज उर्फ पिनू तेलंग, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे व संतोष उर्फ मेंबर देविदास कदम परमेश्वर, उदय उल्हासराव शेटे, अभिजित अनिल गव्हाड, विनायक विश्वासराव इंगळे, रणजीत रंगनाथ पाटील, अर्जुन हजारे, नाना कुऱ्हाडे, सुलतान उर्फ टिपू लतीफ शेख, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू रणजितसिंग ठाकुर असे 26 आरोपी ड्रग्ज तस्कर म्हणुन आरोपी करीत दोषारोप पत्रात आहेत.
ड्रग्ज व्यसनी गट – अलोक काकासाहेब शिंदे, शाम विठ्ठलराव भोसले, संदीप भगवानराव टोले, जगदीश जीवनराव पाटील, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमधाडे, विशाल सुनील सोंजी, आबासाहेब गणराज पवार, अभिजीत अण्णासाहेब अमृतराव व दुर्गेश युवराज पवार हे व्यसनी गटात आहेत.