धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीतील गुन्ह्याची तपासात व्याप्ती वाढताना दिसत आहे, माजी सभापती शरद जमदाडे व आबासाहेब पवार यांना दोषारोप पत्रात सेवन गटात आरोपी केले होते मात्र त्यांना अटक केल्यानंतर 2 वेळेस 11 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांचा गुन्ह्यातील सहभाग केवळ ड्रग्ज सेवना पुरता मर्यादित न राहता ड्रग्ज खरेदी विक्रीला प्रोत्साहन व कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी दरम्यान झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांचा सहभाग कलम 29 अन्वये अधोरेखित केला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तपास सुरु असुन त्याचे दोषारोप पत्र दाखल झाल्यावर अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत.
प्रथमदर्शनी आरोपींचा असलेला सहभाग हा एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 च्या (ड्रग्ज सेवन) व्याप्तीबाहेर जाऊन कलम 29 अंतर्गत प्रोत्साहन आणि कट रचण्यात सहभाग असल्याचे दिसून येते असे न्यायालयाने म्हणटले आहे. दोषारोप पत्रात कलम 27 अंतर्गत सेवन गटात 10 आरोपींचा सहभाग होता त्यातील 2 जणांना अटक केले असुन 8 जन फरार आहेत. सेवनाचा आरोप असल्याने अटकपुर्व जामीन मिळेल, अटक झाल्यावर जामीन मिळेल अशी आशा त्या गटाला होती मात्र 11 दिवसांची कोठडी मिळाली शिवाय आता त्यांचा गुन्ह्यातील सहभाग वाढल्याने कायदेशीर अडचणीत वाढ झाली आहे.
पोलिसांनी 15 एप्रिल रोजी दोषारोप पात्र दाखल केले ते दाखल करताना त्यावेळी ज्या 14 आरोपीना अटक करण्यात आले, त्यांच्या मर्यादित तपास करण्यात आला. जे आरोपी फरार होते त्यांच्या बाबतीत तपास करणे बाकी आहे, ते फरार असल्याने सहभाग, व्याप्ती व इतर पुरावे याचा तपास करणे आहे, झालेल्या तपासाचा फरार आरोपीना फायदा मिळणार नाही यासह अन्य मुद्दे जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख, ऍड सचिन सुर्यवंशी यासह तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी कोर्टात मांडले, त्यामुळे सेवन गटाला अटकपुर्व व अटक झाल्यावर दिलासा मिळाला नाही. जिल्हा न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी ह्या गुन्ह्यांचे स्वरूप, आरोपींची गुन्हेगारी पार्शवभुमी, गुन्ह्याची व्याप्ती व सामाजिक दृष्टीकोन असे मुद्दे मांडत 14 आरोपींचे जामीन नाकारले आहेत.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 37 आरोपीपैकी 17 तस्कर व 2 सेवन गटातील असे 19 आरोपी अटकेत आहेत तर 18 आरोपी फरार आहेत. तस्कर गटातील 27 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
सेवन गट (10 आरोपी) – अलोक काकासाहेब शिंदे, शाम विठ्ठलराव भोसले, संदीप भगवानराव टोले, जगदीश जीवनराव पाटील, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी उपसभापती शरद रामकृष्ण जमदाडे, विशाल सुनील सोंजी, आबासाहेब गणराज पवार, अभिजीत अण्णासाहेब अमृतराव व दुर्गेश युवराज पवार यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्याकडुन ड्रग्ज विकत घेऊन सेवन करुन कलम 27 चे उल्लंघन केल्याने त्यानुसार दोषारोप ठेवण्यात आला आहे. या 10 आरोपीचे ड्रग्ज विकत घेण्यासाठी केलेले पैशाचे व्यवहार, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार यांचे जबाब व इतर पुरावे सापडले आहेत, हे विशेष. यातील जमदाडे व आबासाहेब पवार यांना अटक केले असुन ते धाराशिव जेलमध्ये आहेत.