धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 7 आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या 30 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. पोलिस व सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे युक्तिवाद करणार आहेत. धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे, एक वेळेस मुदतवाढ दिल्याने कोर्टाने युक्तिवाद सादर करण्यास सरकार पक्षास अंतीम संधी दिली आहे. आरोपींच्या वतीने ऍड अंगद पवार, ऍड रामेश्वर सुर्यवंशी, ऍड विशाल साखरे यांनी युक्तिवाद सादर केला त्यावर ऍड देशमुख हे प्रतिउत्तर दाखल करतील. सुनावणीनंतर कोर्ट जामीनावर निर्णय देऊ शकते, यापुर्वी 2 जणांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत.
धाराशिव कारागृहातील आरोपी संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे यांनी अटकपूर्व असे 7 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात 36 आरोपी असुन 14 जेलमध्ये तर 22 फरार आहेत, पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपी संगीता गोळे हिला ज्यावेळी अटक केली तेव्हा तीच्या ताब्यातील जुना मोबाईल व सोने जप्त केले, ते पाव किलो सोने तीचे लग्नाचे स्त्री धन असुन जी 5 कोटी रक्कम सापडली ती रक्कम गेल्या 10 वर्षातील कमाईची आहे. संगीता ही टॅक्स भरणारी असुन सर्व माहिती उपलब्ध आहे. संगीता ही इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होती त्यानंतर तो सुरक्षा रक्षक म्हणुन काम करीत होती त्यामुळे ते पैसे तिने कामाविले असुन उत्पन्नाचा स्रोत काय आहे हे तिला जामीन मिळाल्याशिवाय सांगता येणार नाही अदा युक्तिवाद ऍड रामेश्वर सूर्यवंशी यांनी सादर केला. आरोपी संगीता सोबत तिची 1 वर्षाची मुलगी जेलमध्ये सोबत आहे, त्या मुलींला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. तिचा तो अधिकार संरक्षित राहावा व त्याला बाधित होऊ नये यासाठी जामीन द्यावा अशी विनंती कोर्टाला करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देण्यात आले. संतोष खोत हा कुटुंबकर्ता असुन त्यालाही जामीन द्यावा अशी विनंती केली.
आरोपी अमित अरगडे व युवराज दळवी यांच्या वतीने ऍड अंगद पवार यांनी युक्तिवाद सादर केला. गुन्हा नोंद झाल्यावर अटक करतेवेळी नोटीसमध्ये अटकेची करणे लेखी नमुद करणे गरजेचे होते मात्र पोलिसांनी ते केले नाही. नियमांचे पालन पोलिसांनी न केल्याने अटक, रिमांड, मुद्देमाल जप्ती व इतर सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे. पोलिसांनी अनेक बाबींचे उल्लंघन केले अस्याचे सांगत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दाखले देण्यात आले. मुद्देमाल जप्त, त्याचे नमुने (सॅम्पल) घेते वेळी बंधनकारक असलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन केले नाही. 45 ग्रॅम जप्ती पंचनामामध्ये ड्रग्ज दाखवले असताना मॅजिस्ट्रेट समोर 43 ग्रॅम आले, 2 ग्रॅम गेले कुठे, हे असे का ? पोलिसांनी नमुने घ्यायचे नाही असे नमुद आहे मात्र ते घेतले गेले. एक प्लास्टिक पाऊच 20 मिली ग्रॅम असे तर 13 ग्रॅम प्लास्टिक वजन कमी झाले पाहिजे असे एकंदरीत सगळे चुकीचे आहे, असा युक्तिवाद ऍड पवार यांनी केला.
पंचनाम्यात पांढरी पावडर असा उल्लेख केला ती टॉलकम पावडर देखील असु शकते. तसेच इन्व्हेंटरीमध्ये सॅम्पलचे वजन झिरो ग्रॅम दाखविले आहे त्यामुळे रिकामे पॉकेट पाठवले आहे असे म्हणत त्याचा वैज्ञानिक तपासणी अहवाल सुद्धा तसाच झिरो येणार व भविष्यात आरोपी निर्दोष सुटणार आहे असा दावा ऍड पवार यांनी केला. जर आरोपी सुटणार असतील तर मग अटक का असे म्हणत काही केस लॉ देण्यात आले.