धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना महत्वाचे पुरावे व माहिती हाती आली असुन त्यानंतर तपासाला गती आली आहे. सेवन गटातील आरोपी आबासाहेब पवार याला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासे त्याने पोलिसांसमोर केले आहे. पवार व आरोपी विनोद गंगणे हे फरार असताना एकत्र राहत होते शिवाय पवार याच्या मोबाईल फोनमध्ये ड्रग्जचे महत्वाचे पुरावे सापडले आहेत, 11 दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर पवार सध्या जेलमध्ये आहे.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत तस्कर व सेवन असे 2 गट केले असुन 37 पैकी 10 सेवन गटातील आरोपीना कलम 27 लावले आहे, त्याना तुलनेत लवकर जामीन व दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती त्यातूनच लिटमस टेस्ट म्हणुन काही ‘अटकेचे प्रयोग’ सुरु आहेत. पवार गंगणे एकत्र होते हे त्याने स्वतः कबुल केले आहे. विनोद गंगणे हा 13 मे रोजी धाराशिव न्यायालयात ‘आत्मसमर्पण’ (सरेंडर) करण्यासाठी आला मात्र तिथे कायदेशीर बाबींची ‘चाचपणी’ केल्यानंतर दिलासा मिळणार नाही हे लक्षात येताच कोर्टातून निघुन गेला. तिथे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या व तो निघुन गेला मात्र याचे खापर पोलिस यंत्रणावर फोडण्यात आले. आत्मसमर्पण नंतर अटकेचे प्रयोग हे नाट्य सुरु आहे. ड्रग्ज नंतर 2021 पासूनच्या मटका रॅकेट गुन्ह्यात गंगणेसह 33 जन आरोपी आहेत.
तपासादरम्यान अटक आरोपी आबासाहेब पवार याचे फरार आरोपी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे याच्या सोबत एमडी ड्रग्ज पावडर पुड्या एका इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मोजणी करतानाचे फोटो मिळाले आहेत. वजन काटा व त्यावर काही पुड्या मिळाल्या असुन पोलिस याचा अधिक शोध घेत आहेत. पवार याने त्याचा मॅनेजरच्या खात्यावरून ड्रग्ज तस्कर संगीता गोळे, संतोष खोत, चंद्रकांत बापु कणे, विनोद पिटू गंगणे,प्रसाद कदम, गजानन हंगरगेकर यासह अन्य आरोपी सोबत आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.
ड्रग्ज तस्करीतील सेवन गटातील आरोपी पवार हा विनोद गंगणे याच्या सोबत पुणे, लोणावळा व सोलापूर येथे राहिला असल्याचे त्याने कबुल केले आहे. तुळजापूर शहरामध्ये व इतर ठिकाणी अमली पदार्थ खरेदी विक्रीचे मोठे रॅकेट असुन त्यामध्ये कोन सक्रिय आहेत.ड्रग्ज तस्करीचे समुळ उच्चाटन करणे बाकी असुन आरोपी किती काळापासून अंमली पदार्थांची खरेदी विक्री करतो. तो अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी पैसे कोठुन उपलब्ध करत होता, त्याचा फायनांन्सर कोण आहे, याबाबत तपास पोलिस करीत आहेत.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 37 आरोपीपैकी 27 आरोपी तस्कर गटात तर 10 आरोपी सेवन गटात आहेत त्यातील 17 तस्कर व 2 सेवन गटातील असे 19 आरोपी अटकेत आहेत तर 18 आरोपी फरार आहेत. तस्कर गटातील 27 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
ड्रग्ज प्रकरणात आजवर कोर्टाने 14 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले असुन त्यात 6 आरोपी फरार आहेत तर 8 आरोपी हे धाराशिव येथील जेलमध्ये आहेत, 4 आरोपींचे जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत.