धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार प्रक्रिया निर्विध्नपणे संपन्न व्हावी तसेच मंदिर वास्तुतील आत्मबल संर्वधित व्हावं यासाठी वाराणसी (काशी) स्थित पद्मश्री प.पु.श्री गणेश्वर द्रविड शास्त्री व ब्रम्हवृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गासप्तशती संपूटीत अनुष्ठानाचे आयोजन केले आहे. तुळजाभवानी मंदिरात सोमवारी 16 जुन रोजी सकाळी 8.30 ते 5 वाजेपर्यंत हा विधी चालणार असुन यज्ञ मंडपाच्या मागे हे कार्यक्रम होणार आहेत. तुळजाभवानी मंदीर संस्थानने यांचे आयोजन करण्यात आले आहे. जीर्णोद्धार विधी (वास्तु चालन विधी) करीता उपस्थित राहावे असे आवाहन मंदीर संस्थानने केले आहे. या विधीनंतर नेमके काय काम होणार हेमात्र कळू शकले नाही.
तुळजाभवानी मंदिरातील या विधीबाबत पुजारी मंडळ अनभिज्ञ असुन आम्हाला विश्वासात न घेता व माहिती न देता हे सुरु आहे. कोणता विधी कशासाठी करावा याबाबत कोणाशीही चर्चा केली नाही, एकंदरीत मनमानी कारभार सुरु आहे. मंदीर संस्थांनचे सल्लागार, ब्राह्मण वृंद व पुजारी यांना विश्वासात घेतले नाही किंवा त्यांचा सहभागाबाबत आम्हाला विचारले नाही. मंदीर संस्थानने याचे लेखी कळविले नाही, खर्च कोन करणार, पुजेला कोन बसणार? याला प्रशासकीय मान्यता आहे का? जीर्णोद्धार कामे सुरु असुन हे आताच का? असे प्रश्न पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी उपस्थितीत केले.
तुळजाभवानी मंदीर जीर्णोद्धार व श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने प्रस्तावित 1 हजार 865 कोटींचा विकास आराखडा अशी 2 वेगवेगळी विकास कामे होणार आहेत. तुळजाभवानी मंदीर संस्थानला भाविकांनी अर्पण केलेल्या पैशातुन अर्थात स्वनिधीतुन ही 58 कोटी रुपयांची जीर्णोद्धारची कामे केली जाणार आहेत. तुळजाभवानी मंदिरातील जतन व दुरुस्ती कामाचे 6 भाग म्हणजे टप्पे करण्यात आले आहेत.

पहिला भागात भुयारी मार्ग,यज्ञ मंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदीर जतन व दुरुस्ती हे 11 कोटी 36 लाखांचे काम आहे. दुसरा भागात कार्यलयीन, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी,खुला प्रेक्षक मंच, गोमूख तीर्थ, दत्त मंदीर, मातंगी मंदीर,कल्लोळ तीर्थ, निंबाळकर महाद्वार,मार्तंड ऋषी मंदीर, टोळ भैरव मंदीर, दीप माळ, शिवाजी महाद्वार व ओवऱ्या,खंडोबा व यमाई मंदीर जतन व दुरुस्ती अशी 12 कोटी 9 लाखांची कामे आहेत.
तिसरा भागात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 46 लाखांची कामे आहेत. चौथा भागात महंत तुकोजी बुवा मठावरील ओव्हऱ्या,आराध्य खोलीवरील ओव्हऱ्या, आराध्य खोली दगडी फरशी जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 45 लाखांची कामे आहेत.
पाचवा भागात मुख्य प्रवेशद्वार व जिजामाता महाद्वार जतन व दुरुस्तीचे 7 कोटी 21 लाख आणि सहावा भागात लिफ्ट व रॅम्पचे 4 कोटी 25 लाख असे 53 कोटी 84 लाख 47 हजार 7 रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.