धाराशिव – समय सारथी
श्री क्षेत्र तुळजापूर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसर विकास आराखड्याची महत्वाची बैठक राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीतीत घेण्यात आली. येत्या नवरात्र उत्सवात मंदीर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असे पालकमंत्री म्हणाले. या बैठकीला आमदार राणाजगजीतसिंह पाटील अनुउपस्थितीत होते.
विकास आराखड्यांतर्गत श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याची 108 फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. विकास आराखडामध्ये जे संकल्पचित्र दाखवण्यात आले आहे त्यात तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजा दाखवण्यात आलेली आहे. याला भाविक व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही अष्टभुजा प्रतिमा काढून टाकण्यात यावी. शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री तथा तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रे, परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांना दिले.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठा पैकी श्री. तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे 1 ते 1.5 कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 1 हजार 865 कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.
हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना बैठकीत केल्या. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात असे ही सांगितले.
श्री तुळजाभवानी देवीच्या अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा आणि पुजारींचा विरोध असल्याने त्यांच्या भावनांचा आदर करत श्री तुळजाभवानी देवीचे शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. या बैठकीला छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.