तुळजापूर – समय सारथी, नंदकिशोर नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी नवरात्राच्या 9 दिवसात करोडो रुपयांचे दान अर्पण केले आहे अजुन कोजागिरी पौर्णिमा होणे बाकी असल्याने त्यात आणखी भर पडणार आहे.
देवी चरणी 73 तोळे म्हणजे जवळपास पाऊण किलो सोने तर 11 किलो 954 ग्राम चांदी अर्पण केली असून सोने चांदी व्यतिरिक्त 3 कोटी 73 लाख 48 हजाराचे उत्पन्न झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.
सशुल्क दर्शनातुन 1 कोटी 93 लाख सर्वाधिक कमाई तर दानपेटीमध्ये 1 कोटी 57 लाख जमा तर इतर माध्यमातून 22 लाख 39 हजार उत्पन्न झाले आहे.
29 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमापर्यंत तुळजाभवानी नवरात्र उत्सव चालणार आहे. या काळात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यातून लाखो भाविक येतात त्यात पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
तुळजाभवानी मातेच्या मंदीर संस्थांनाचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 कोटीने वाढले असुन 2021-22 या वर्षात 29 कोटी उत्पन्न मिळाले तर 2022-23 या वर्षात हे उत्पन्न वाढून थेट 54 कोटीवर गेले. 2021-22 मध्ये सशुल्क दर्शनातून 7 कोटी 89 लाख तर 2022-23 मध्ये सशुल्क दर्शनातून 15 कोटी 54 लाख मिळाले. सिंहासन व दानपेटीत 2021-22 साली 8 कोटी 70 लाख तर 2022-23 मध्ये 19 कोटी 72 लाख उत्पन्न मिळाले.
जिल्हाधिकारी तथा संस्थांनाचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे व विश्वस्त मंडळाने भाविकांना सुलभ दर्शनासाठी दिलेल्या सुविधा व उपाययोजनामुळे हे उत्पन्न वाढले असुन याला विश्वस्त, पुजारी मंडळ, व्यापारी, स्थानिक नागरिक यांची साथ मिळाली.
जिल्हाधिकारी स्वतः अनेक वेळा भेट देऊन आढावा घेतात.तुळजाभवानी मंदीर व परिसर, तुळजापूर शहराचा विकास आराखडा अंतीम टप्प्यात असुन अनेक सुविधामुळे उत्पन्न व पर्यटन विकास होणार आहे. दर्शन मंडप,परिसर सुशोभीकरण यासह अनेक कामे होणार आहेत. राजकीय विरोध व काही जणांनी मानसिकता बदलली तरच विनाअडथळा हे शक्य होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे,आमदार राणाजगजीतसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे, तहसीलदार अरविंद बोळंगे या विश्वस्तसह मंदीर तहसीलदार सोमनाथ माळी,धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतूले, संतोष पाटील यासह मंदीर प्रशासनातील लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे, पोलिस विभाग, सुरक्षा व्यवस्था विभागाने उत्कृष्ट नियोजन केले.