तुळजापूर – समय सारथी
तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शीळेला तडे गेल्याची बाब पुरातत्व विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत उघड झाली आहे.मंदीर गाभाऱ्यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढुन टाकल्यानंतर काही शिळा खचल्या आहेत तर काहींना तडे गेले आहेत. यावेळी महंत तुकोजीबुवा, पुजारी मंडळाचे विपीन शिंदे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह मंदीर संस्थानचे अधिकारी उपस्थितीत होते. तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या जतन व संवर्धन म्हणजे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या निगराणी व मार्गदर्शनाखाली सुरु आहे. गाभाऱ्यातील आतील भिंतीची फरशी काढुन टाकण्यात आली आहे. गाभाऱ्यातील काही शीळाना तडे गेले असुन त्या शिळांचे स्ट्रॅक्चरल ऑडिट व रडार मार्फत तपासणी करण्यात येणार असुन अहवाल आल्यानंतर त्या बदलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिर संस्थान करत असलेल्या कामावर समाधान व्यक्त करत पाहणी केली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे जतन व संवर्धनाचे 65 कोटी रुपयांचे काम मंदीर संस्थानच्या स्वनिधीतुन सुरु आहे. जीर्णोद्धाराच्या विविध कामांची जिल्हाधिकारी व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्याच्या कामाला पुरातत्व विभागाने सुरुवात केली आहे. देवीच्या मंदिरातील मंडपाचे बरेचसे दगड कललेले असल्याने ते पुर्ण काढुन पुन्हा नव्याने उभे केले जाणार आहेत. तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचे स्ट्रॅक्चरल इंजीनिअरिंग व रडार तंत्रज्ञानाचा वापर करुन दगड आगामी 200 वर्ष मंदिराच्या कळसाचा भार सहन करू शकतील का याचा अहवाल पुरातत्व विभाग 8 दिवसात सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच महाद्वार बाबतही 8 दिवसात पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालय अहवाल देणार आहे त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
तुळजाभवानी मंदिरातील जतन व दुरुस्ती कामाचे 6 भाग म्हणजे टप्पे करण्यात आले आहेत त्यात पहिला भागात भुयारी मार्ग,यज्ञ मंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदीर जतन व दुरुस्ती हे 11 कोटी 36 लाखांचे काम आहे. दुसरा भागात कार्यलयीन, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी,खुला प्रेक्षक मंच, गोमूख तीर्थ, दत्त मंदीर, मातंगी मंदीर,कल्लोळ तीर्थ, निंबाळकर महाद्वार,मार्तंड ऋषी मंदीर, टोळ भैरव मंदीर, दीप माळ, शिवाजी महाद्वार व ओवऱ्या,खंडोबा व यमाई मंदीर जतन व दुरुस्ती अशी 12 कोटी 9 लाखांची कामे आहेत. तिसरा भागात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 46 लाखांची कामे आहेत. चौथा भागात महंत तुकोजी बुवा मठावरील ओव्हऱ्या,आराध्य खोलीवरील ओव्हऱ्या, आराध्य खोली दगडी फरशी जतन व दुरुस्ती अशी 9 कोटी 45 लाखांची कामे आहेत.पाचवा भागात मुख्य प्रवेशद्वार व जिजामाता महाद्वार जतन व दुरुस्तीचे 7 कोटी 21 लाख आणि सहावा भागात लिफ्ट व रॅम्पचे 4 कोटी 25 लाख असे 53 कोटी 84 लाख 47 हजार 7 रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.