तुळजाभवानीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरण – विधी विभागाचा सल्ला घेऊन आठवड्यात निर्णय
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोने दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली असुन लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे त्यातील सोने वितळविले जाणार आहे. 207 किलो सोनेपैकी 111 किलो शुद्ध सोने मिळू शकते असा अंदाज आहे यापुर्वी देवीकडे 47 किलो शुद्ध 24 कॅरेट सोने आहे. यानंतर देवीकडे जवळपास दीडशे किलो शुद्ध सोने जमा होऊ शकते.
देवीच्या डब्यातील पुरातन दागिने मोजदाद प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बैठक घेतली. अहवालावर चर्चा करुन समितीने काढलेल्या निष्कर्षानंतर कायदेशीर काय कारवाई करायची यासाठी विधी विभागाचे मार्गदर्शन मागविले आहे.
येत्या आठवड्यात अंतीम अहवालावर कायदेशीर मार्गदर्शन येण्याची शक्यता आहे.काही सोन्याची दागिने व चांदीच्या वस्तू गायब आहेत तर काही दागिन्याचे वजन आश्चर्यकारकरित्या वाढले आहे.
तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने गहाळ प्रकरणी एका महंतासह तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक व इतर काही मानकरी यांना अंतीम खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार अंतीम अहवाल सादर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक राजघराण्यानी देवीला अर्पण केलेल्या नाणे चोरी प्रकरणी यापूर्वीच गुन्हा नोंद झाला असुन त्यात एकही नाणे पोलिसांना तपासात हस्तगत झाले नाही, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.त्यामुळे यासह इतर बाबीवर काय कारवाई करायची यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.