बार्शी – समय सारथी, किरण आवारे
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नर्तकी पुजा गायकवाड हिची 3 दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार असुन तिला बार्शी येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा गुन्हा नोंद आहे तर ही आत्महत्या नसुन घातपात असल्याचा त्यांच्या कुटुंबाचा आरोप आहे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. पुजाच्या आर्थिक व व्यावसायिक हालचालींची कसून चौकशी सुरु आहे. नर्तकी पुजा ही धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्रावर होती, घटनेपुर्वी बर्गे तिथे तिला भेटायला आले होते.
पोलिस चौकशीत तिच्या मोबाईलसह गोविंद बर्गे यांचा मोबाईल तपासण्यात आला आहे. दोन्ही मोबाईलमधील संशयास्पद संपर्कांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून, संबंधित व्यक्तींना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकनाट्य कला केंद्रातील नर्तिका पूजाच्या नादाला लागून बर्गे यांनी महागड्या वस्तू, पैसे दिले, गेवराई येथील बंगला नावावर न केल्यास बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली अखेर वैतागून त्यांनी आत्महत्या केली.
पोलिसांनी पूजाचे गेल्या दोन ते तीन वर्षांतील आर्थिक व व्यावसायिक व्यवहार पडताळण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये तिने केलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांचा तपशील मिळवण्यात येत आहे. विशेष म्हणजे वैराग (ता. बार्शी) येथील मानेगाव हद्दीतील खुल्या प्लॉटच्या खरेदीत गोविंद बर्गे साक्षीदार म्हणून सामील असल्याचे पुरावे समोर आले आहेत. हा व्यवहार 21 जानेवारी 2025 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवण्यात आला होता.
तपासाच्या दृष्टीने शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, धाराशिव जिल्ह्यातील तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ येथील लोकनाट्य कला केंद्र चालकांना वैराग पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याचप्रमाणे पूजाच्या काही मैत्रिणींनाही पोलिसांनी विचारपूस केली असून, या चौकशीमधून अनेक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.