मी पक्ष सोडणार नाही, पक्षात राहून त्यांच्या वृत्तीला विरोध करणार – पाटील विरुद्ध पाटील सामना रंगणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने राजकीय आखाडा पेटला असुन आगामी निवडणुकीत व राजकारणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना दाखवुन देऊ असे म्हणत सुधीर पाटील यांनी उघड आव्हान दिले आहे. आमदार राणा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर नेत्यांना जाणीवपूर्वक कुस्ती स्पर्धेला येऊ दिले नाही, त्यासाठी त्यांनी गेली 4 दिवस तगडी फिल्डिंग लावली असा आरोप केला.
आमदार राणा यांनी मुख्यमंत्री यांना सुद्धा येऊ दिले नाही, उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत इतर नेत्यावर दबाव आणला मात्र मी स्पर्धा यशस्वी करुन दाखवली आता. पक्षात प्रतिस्पर्धी निर्माण होईल अशी त्यांना नेहमी भीती असते म्हणून त्यांनी असे केले मात्र आता यापुढे त्यांची व माजी गाठ असल्याचे पाटील यांनी सांगत दंड थोपटले. मी भाजपात आहे त्यामुळेच जास्त विरोध झाला, मी पक्ष सोडणार नाही मात्र आमदार यांच्या वृत्तीला पक्षात राहून विरोध करणार असेही सांगितले.
तुळजापूर येथील भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कश्या होणार नाहीत यासाठी प्रयत्न केले, हे मला माहित आहे मात्र मी खंबीर असल्याचे आयोजक सुधीर पाटील यांनी सांगत गंभीर आरोप केले. सर्व पक्षाचे प्रतिनिधी आले मात्र आमदार, खासदार लोकप्रतिनिधी आले नाहीत याचं दुःख असल्याचेही पाटील म्हणाले.
पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यावर दबाव आणला गेला त्यामुळे ते आले नाहीत मात्र मंत्री सावंत यांनी कुस्ती स्पर्धेसाठी अनमोल मदत केली असे पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी सारख्या मोठ्या स्पर्धा धाराशिव शहरात आयोजित केल्या आहेत मात्र चौगुले सोडता कोणी आले नाही. मी काय प्रयत्न केले मला माहित आहे, मला काय त्रास झाला हे सांगावे लागेल. काही हरकत नाही मी फार खंबीर आहे. मी कोणताही कार्यक्रम घेतला तर मला संघर्षातून यावे लागत आहे पण मी कार्यक्रम यशस्वी करुन दाखवतो असे सुधीर पाटील म्हणाले.