धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील विविध कामात झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळा प्रकरणी तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आली असुन याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काढले आहेत. नगर परिषदेतील सर्व दाखल गुन्ह्याचा तपास हे पथक करणार असुन दर महिन्याला तपासाचा प्रगती अहवाल देणार आहे. विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश धस यांनी याबाबत मागणी केली होती त्यानंतर ही समिती गठीत करण्यात आलेली आहे.
अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन हे या समितीचे प्रमुख असणार असुन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड हे तपास अधिकारी,आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचा या पथकात समावेश असणार आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगर परिषदेत अपहार व अनेक कामात घोटाळे झाल्याची तक्रार केली होती तसेच विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता त्यावर चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री यांनी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. समिती गठीत करण्यात आल्याने भ्रष्ट अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधी यांचे धाबे दणाणले आहे.अवर सचिव रवींद्र औटे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक यांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले होते.
धाराशिव नगर परिषदेत विविध घोटाळ्याचे 7-8 गुन्हे नोंद असून बायोमायनिंग प्रकरण, गुंठेवारी यासह अन्य अंतीम टप्प्यात आहेत त्यामुळे ही एसआयटी सर्व मुद्याचा तपास करणार आहे.