धाराशिव – समय सारथी
शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यापुर्वी शिवसेनेच्या काही पदाधिकारी यांच्यासह जवळपास 40 ते 50 शिवसैनिक यांना पोलीसांनी स्थानबद्ध करीत नजर कैदेत ठेवले. शिवसैनिक नजर कैदेत, काहींना विमानतळावर प्रवेश न देता रोखले मात्र तिथेच काही भाजप पदाधिकारी यांच्यासाठी पायघड्या घालण्यात आल्या. ज्यांना स्थानबद्ध केले त्यांनी अगोदरच शिंदे पिता पुत्रांची ठाणे येथे भेट घेऊन व्यथा, म्हणणे मांडले होते मग हे कशासाठी हा सवाल होत आहे. ज्यांनी स्तिथीशी जुळवून मौन पाळले त्यांना मानपान दिला गेला.
राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे, नितीन पाटील, प्रवक्ते ऍड योगेश केदार, माजी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, गणेश रोचकरी यांच्यासह धाराशिव, कळंब व तुळजापूर येथील शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात आले व शिंदे गेले की सोडून देण्यात आले. विमानतळावर युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश जगताप यांना अडवले मात्र काही भाजप पदाधिकारी व त्यांच्या सोबत असलेल्या फोटोग्राफर व लवाजम्याला पायघड्या घालत थेट प्रवेश देण्यात आला. ही सुरुवात असुन आगामी काळात आम्हाला विविध मार्गाने अडचणीत आणण्याचे, कोंडी करण्याचे कारस्थान होऊ शकते अशी भिती व्यक्त केली.
स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्याची कदाचित ही धाराशिवच्या इतिहासात पहिली वेळ असावी म्हणून काळा दिवस, हुकूमशाहीची नांदी अश्या प्रतिक्रिया सोशल मिडीयात उमटत आहेत. ज्यांनी विरोध केला, पाठबळ देत समर्थन केले त्यांना लगेच स्थानबद्ध असा निकष यात दिसला. या सगळ्या प्रक्रियेला संमती व मुकसंमती कोणाची याची चर्चा रंगली आहे. बहुतांश शिवसैनिक हे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत गटाशी संबंधीत होते त्यामुळे त्यांना टार्गेट केले गेले. जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुकीत झालेल्या तिकीट वाटप, गोंधळ, भाजप कार्यकर्ते यांना शिवसेनेकडुन उमेदवारी, तत्कालीन संपर्कप्रमुख राजन साळवी, अजित पिंगळे यांच्यावरील रोष यासह अन्य बाबींची पोलखोल होऊ नये यासाठी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवुन ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप ऍड अजित खोत यांनी केला.
उपमुख्यमंत्री यांच्यासमोर होऊन पक्ष कार्यक्रमात गोंधळ उडू शकतो म्हणुन कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र याला शिवसेना पक्षातील कोणाची संमती व मुकसंमती होती याचीही चर्चा रंगु लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसैनिक रस्त्यावर उतरणार म्हण्टले की सत्ताधारी त्यांना स्थानबद्ध करायचा मात्र सत्ता असताना शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली. ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी बंड केल्याचे शिंदे सांगतात मात्र त्यांच्याच पदाधिकारी यांना ते न्याय देऊ शकले नाहीत.
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना, ही घटना फक्त शिवसैनिकांसाठीच नाही तर सबंध पक्षीय राजकारणासाठी भविष्यातील चपराक आणि धोक्याची घंटा असेल, काळा दिवस आहे. तुम्ही नजर कैद कराल हो पण लोकांच्या भावनांच काय, त्यासाठी नैतिकता आणि नीतिमत्ता साफ लागते असे अविनाश खापे म्हणाले.
धाराशिवमध्ये शिंदे गटाचा “स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच नजरकैदेत ठेवण्याचा प्रकार नव्या हुकूमशाहीची नांदी” अशी प्रतिक्रिया उमटत आहे. हिम्मत असेल तर थेट भिडा, 2 हात करा, गावात कार्यक्रम घेता आणि आम्हालाच पकडता, असे म्हणत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी भिडण्याचे आव्हान दिले. 55 जिल्हा परिषद जागा पैकी 29 जागा धाराशिव, कळंब व तुळजापूर येथील आहेत. 5 जागा घेतल्या त्यात 4 उमेदवार हे भाजपचे होते, नगर परिषद व जिल्हा परिषद तिकीट विकले. ही तक्रार मांडल्यावर साळवी यांना काढले. इतर तक्रारी करणार होतो म्हणुन 50 जणांना स्थानबद्ध केले. पोलिसांना पुढे का करता, हिटलरशाही चालणार नाही, ही कैफियत एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडणार आहोत व नंतर पुढील राजकीय दिशा ठरवू असे म्हणत सुचक इशारा साळुंके यांनी दिला.
ऍड योगेश केदार यांनी बाजु मांडत निषेध करीत व्हिडिओ पोस्ट केला लगेच त्यांचा शोध घेत बेंबळी पोलिस हद्दीत स्थानबद्ध केले. शिवसेनेत फूट पाडू पाहणाऱ्या राणा पाटलाच्या विरोधात कुणीच बोलायला तयार नव्हते. ते ठासून बोलण्याचे धाडस केले हाही गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. ज्यांनी सेटिंग केली ते मात्र आज तुपाशी आहेत आणि लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र जेल मिळाली असे ते म्हणाले.











