डाव टाकला – सुधीर पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
धाराशिव – समय सारथी
जुन्या घरी, स्वगृही परततोय, पुन्हा एकदा जात-गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना असा नारा देत भाजपचे नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. पुत्र अभिराम पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी सेनेत प्रवेश केला. धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा दावा असुन त्यावर भगवा फडकवणार असे सांगत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपमधुन शिवसेनेत यावे असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता, माझ्या पक्ष प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर प्रवेश केला असे त्यांनी सांगितले. माझ्या संपर्कात उबाठा गटाचे अनेक जुने सहकारी असुन ते सोबत येतील, लवकरच रामदास कदम यांच्या नेतृत्वात धाराशिव येथे पक्ष मेळावा होणार असुन त्यात अनेकजन प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुधीर पाटील हे संभाव्य उमेदवार असु शकतात, त्यांनी यापुर्वी धाराशिव व तुळजापूर विधानसभा लढवली आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेसह त्यांच स्वतःचे मोठे राजकीय जाळे आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पक्षाअंतर्गत कुरघोडी व राजकारणावर त्यांनी उघडपणे टीका केली होती, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर हा वाद वाढला होता, लोकसभा पराभवाची मिमांसा करताना पाटील यांनी घराणेशाहीसह डॉ पाटील परिवाराच्या कारभारावर टीका केली होती.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या रक्तात आहेत, लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या विचारांचा झंझावत धारशिव जिल्ह्यात आपण सर्वांनीच पाहिलाय. त्यामुळेच, माझ्या सामाजिक व राजकीय आयुष्याची सुरुवातच शिवसैनिक म्हणून झाली. मात्र, मधल्या काळात काही राजकीय स्थित्यंतर बदलत गेली अन् मूळ शिवसेनेपासून मी काहीसा दूर गेलो. आज पुन्हा एकदा आपल्या स्वगृही परततोय, आपल्या शिवसेनेत येतोय, बाळसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेत घरवापसी करतोय.राज्याचे मुख्यमंत्री व बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
पाटील म्हणाले की, शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्ह्यात मी राजकीय कार्याला सुरुवात केली. त्यानंतर, माझ्या कामाची पद्धत आणि शिवसैनिकांमधला गुण रक्तातच असल्याने शिवसेनेत मला उपजिल्हाप्रमुख म्हणून 3 वर्षे काम करण्याची संधी मिळाली तर 6 वर्षे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या काळात शेतकरी, व सर्वसामान्यांसाठी अनेक आंदोलने केली. शिवसेनेच्या शाखा गावखेड्यात वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे, आज पुन्हा शिवसेनेत परत येत असताना आपल्या जुन्या घरी आल्याची जाणीव होतेय.
स्व. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेनेत सन 1988 साली मी पक्षप्रवेश केला व 1989 साली धाराशिवमधून विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यानंतर 2014 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे, शिवसेनेसोबत जोडलेलं नातं, आणि शिवसैनिक म्हणून असलेला बाणा हा कधीही सुटणार नाही. म्हणूनच, आज पुन्हा शिवधनुष्य हाती घेत आहे, धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी, आपल्या लोकांसाठी पुन्हा एकदा… जात-गोत्र अन् धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. असा नारा दिला आहे.