धाराशिव – समय सारथी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उबाठा गटातील खासदार यांची मुंबई येथे भेट झाली असुन त्या बैठकीत 6 खासदारांनी शिवसेना शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे या बैठकीला व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थितीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
8 एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास सुरू झालेली ही बैठक 9 एप्रिलच्या सकाळपर्यंत झाल्याचा दावा मुंबई येथील एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. बैठकी दरम्यान शिंदे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कायम संपर्कात राहुन चर्चेचा तपशील व खासदार यांचे म्हणणे मांडत होते.
दरम्यान खासदार ओमराजे हे गोवा येथे हिंदी भाषेच्या समिती बैठकीत असुन गेल्या 4 वर्षापासून ही अशी अफवा व चर्चा आहे, यावर काय प्रतिक्रिया द्यायची असे त्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. एखाद्या पक्षाच्या संसदीय किंवा विधान गटातील दोन-तृतीयांश सदस्य दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास सहमत झाले, तर ते अपात्रतेतून सुटतील. शिवसेना उबाठा संसदीय गटासाठी हा आकडा 6 खासदार यांचा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलेल्या व त्यांना पाठिंबा दिलेल्या खासदारांनी पक्ष बदलण्याची शपथ घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सामील झालेल्या दोघांनी पक्षात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे.
ठाणे-पोखरण रोडवरील एका ठिकाणी 6 खासदार स्वतंत्रपणे पोहचले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व एक आमदार असे मोजके 4-5 जण त्या बैठकीला कोणत्याही ताफाशिवाय गुप्तता पाळत गेले. तिथे 6 खासदारांनी पक्ष विलीनीकरणात स्वारस्य दर्शवणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचे सांगितले जाते. 2 खासदारांनी शहरात परतल्यावर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचे आश्वासन दिले असा दावा केला आहे.
मागील काही दिवसापुर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षफुटी व विविध चर्चाच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाच्या खासदार यांची बैठक घेतली त्यात खासदारांनी जाहीरपणे निष्ठेची शपथ घेतली, त्यामुळे आगामी काळात काय होते ते पाहावे लागेल.
21 जुन 2022 रोजी शिंदे यांनी 40 आमदारांना सुरत आणि गुवाहाटी येथे नेऊन बंड केले होते. भारतीय निवडणूक आयोगाने नंतर शिंदे गटालाच शिवसेना म्हणून मान्यता दिलीव त्यांना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह प्रदान केले.











