बॅनरबाजी करून राजकारण, आंदोलनाची नौटंकी, सत्य मांडा, श्रेय घेऊ नका – शहर प्रमुख आकाश कोकाटे यांची आक्रमक भुमिका
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या 140 कोटी रुपयांच्या वादात आता शिवसेना शिंदे गटाने उडी घेतली असुन शहरप्रमुख आकाश कोकाटे यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्वार्थी राजकारण करून श्रेयवाद लाटण्यासाठी थयथयाट कशाला ? स्वतः निधी आणल्याचा दावा करून खोडा घालणाऱ्या मंडळींनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायला हवे असे म्हणत इशारा देत निशाणा साधला आहे. जनतेच्या डोळ्यात धुळफेक करू नका, बॅनरबाजी करून राजकारण चालत नसते. आंदोलनाची नौटंकी आताच का? जनतेसमोर सत्य मांडा, श्रेय घेऊ नका असे आवाहन केले.
धाराशिव शहरवासियांना खड्डयांच्या खाईत कोण लोटले? स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी लाटून जनतेला दुर्गंधीत कोण ढकलले? अंतर्गत रस्त्यांवर भुयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्ते उकरून लोकांचा बळी घेणारे एकदा तरी लाजले का? स्वतःचे पाप झाकण्यासाठी बगलबच्चांना पुढे करुन आंदोलनाची नौटंकी करणार्यांना अजुनही लाज वाटत नाही का? असा सवाल कोकाटे यांनी केला.
पिण्याच्या पाण्याचीही बोंब असताना केवळ निधीच्या श्रेयवादावरून प्रत्येक वेळी थयथयाट कशाला? धाराशिवकर जनता सूज्ञ आहे. तुमची नौटंकी जाणून आहे. म्हणून यापुढील काळात निधी कोणी आणला, कोणी दिला यावर भाष्य करण्यापेक्षा जनतेसमोर सत्य मांडा. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जनतेची माथी भडकविण्यापेक्षा स्वतः आपण कोणत्या पायरीवर आहोत याचे भान ठेवा आणि मगच राजकारण खेळा. धाराशिवच्या विकासात योगदान द्यायचे नसेल तर आडकाठी आणू नका, असे ते म्हणाले. योग्य वेळी जिल्हा प्रमुख सुरज साळुंके व आमची टीम यातील सत्य बाहेर आणू असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे तत्कालीन पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे धाराशिव नगर परिषदेला पहिल्यांदाच भरघोस 140 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून शहरातील 59 रस्ते व इतर कामांना खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्या मंडळींनी आभार मानायला पाहिजे होते.
निधी कोणी मंजूर केला आणि कोणी मंजूर करवून आणला याचे भान स्वार्थाचे राजकारण आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे महापाप करणार्यांना राहिलेले नाही. म्हणून ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर थयथयाट सुरु आहे. श्रेयवादासाठी राजकीय पक्षाच्या व त्यांच्या इतर त्यांच्या बगलबच्चांना जनता यावेळेस माफ करणार नाही याचे भान त्यांनी बाळगावे, अन्यथा नगर परिषद निवडणुकीत तुम्हाला एकही जागा पदरी पडणार नाही असे ते म्हणाले.
काही राजकीय मंडळींनी निधीचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे मात्र निधी कोणी खेचून आणला याचे भान मात्र त्या नेत्यांना राहिले नाही. केवळ बॅनरबाजी करून राजकारण चालत नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर आजही शिवसेना टिकून आहे, हे बॅनर बाजी करणाऱ्यानी लक्षात ठेवले पाहिजे.
धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था करून ठेवलेले उबाठाचे खासदार, आमदार आणि तत्कालीन नगराध्यक्ष 140 कोटीच्या निधीवर देखील डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपल्या धाराशिवचे विद्यमान कर्तव्यदक्ष पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सदरील निविदा ही चुकीच्या पद्धतीने केली आहे नियमांचा भंग करून केली आहे असे म्हणत तक्रार केली.
काही राजकीय मंडळींच्या लाडक्या गुत्तदाराला हे 140 कोटीचे काम मिळावे यासाठी अत्यंत टोकाचे प्रयत्न केले आहेत. ‘गिरे भी तो टांग ऊपर’ या उक्तीप्रमाणे आम्हीच हा निधी मिळवून आणला आणि शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आमच्यामुळेच होणार असा डांगोरा पिटण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. त्यांना येत्या निवडणुकीत चिखल आणि धुरळ्यात जगणारे धाराशिवकर उताणे पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
धाराशिव शहरवासियांना भुयारी गटार योजनेची गरज नसताना शहरातील सर्व रस्त्यांचे खोदकाम करून निधीचा धुरळा उडविला. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुरळा सोसत धाराशिवकर खड्डयांमधून आजही वाट काढत आहेत. परंतु जनतेच्या समस्येऐवजी आपला स्वार्थ साधणार्या लोकांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगर परिषदेची सत्ता हडपण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही निवडणूक यावेळेस इतकी सहज-सोपी नाही हे त्यांच्या लक्षात आलेली नाही. म्हणून ऐनवेळी निधी आम्हीच आणला अशा वल्गना करणार्या आणि इतके दिवस झोपा काढणार्यांना एवढेच सांगणे आहे की जर तुमच्यात हिंमत होती तर धाराशिव शहराचा विकास का झाला नाही? विकासाचे श्रेय घेण्यासाठी पुढे या, पण तुम्ही काय दिवे लावले ते आधी जनतेला सांगा आणि मगच जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्या असे आव्हान दिले.












