धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेत उमेदवारीवरून महायुतीत तणाव वाढला असुन शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक भूमिकेत आला आहे. धाराशिव मतदार संघ परंपरागत शिवसेनेचा आहे, हवं तर भाजपला जागा सोडा मात्र राष्ट्रवादीला जागा सोडू नका असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा परत घेऊन उमेदवार बदलावा असे साकडे घातले आहे. उमेदवारी बदलून जागा शिवसेनेला परत घ्यावी अन्यथा सामूहिक राजीनामे देण्याचा पदाधिकारी यांनी इशारा दिला आहे.
महायुतीत धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सुटून भाजपमधुन आलेल्या अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर आहे मात्र त्याला धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांचा विरोध असुन मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवार बदलाची मागणी केली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त असुन लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. कोणत्याही स्तिथीत राष्ट्रवादीचे काम न करण्याचा निर्णय काल रात्री झालेल्या बैठकीत घेतला आहे. पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी उमेदवारीची मागणी केली होती, त्यासाठी मंत्री सावंत यांनी प्रयत्न सुद्धा केले. धनंजय सावंत यांना उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना गट आक्रमक झाला असुन उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणुका लढलो आहोत त्यांच्या विरोधात प्रचार केला आहे. आता काय आम्ही राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काम करायचं का ? असा संतप्त सवाल उपस्थित करत धनंजय सावंत तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात पक्ष म्हणून तितके वलंय राहिले नाही, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सांगितले तरी लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे अजुन वेळ गेली नाही असे सांगत जागा शिवसेनाच्या धनुष्यबाण याला सोडावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिवसेना गट अलिप्त – मंत्री सावंत यांना पोस्टरवरून वगळले
धाराशिव लोकसभेचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात कमालीची शांतता आहे, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. धाराशिव येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या व उमेदवारी जाहीर झाल्याच्या जल्लोषापासुन शिवसेना शिंदे गट अलिप्तच राहिला. अर्चना पाटील यांना भाजपच्या ज्या प्रमुख पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या त्यात पालकमंत्री डॉ सावंत यांचा फोटो सुद्धा वापरला गेला नाही याबद्दल कार्यकर्ते यांनी उघड संताप यावेळी व्यक्त केला.
आमदार राजेंद्र राऊत, नितीन काळे यांनी अर्चना पाटील यांना पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा दिल्यात त्यात पालकमंत्री सावंत यांचा फोटो वापरण्यात आला नाही. सावंत यांना पोस्टर स्थान देण्यात आले नाही त्यामुळेही शिवसेना पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली.