धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यासह राज्यात बोगस पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न समोर आला असुन शासकीय जमीन, गायरान व तलावाच्या क्षेत्रावर पीक विमा काढण्यात आला आहे. पीक विमा घोटाळ्याचा राज्यभर तपास करुन गुन्हा नोंद करावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. धस यांनी बोगस पीक विमा घोटाळ्याचा प्रश्न लावुन धरला आहे. गुन्हेगारी विश्वात बदनाम झालेला परळी पॅटर्न हा धाराशिवसह राज्यातील इतर जिल्ह्यात पीक विमा घोटाळा करीत आहे. धस हे 11 डिसेंबर रोजी धाराशिव येथे येणार असुन त्या सभेत परळीचा गुन्हेगारी पॅटर्न व बोगस पीक विमा पॅटर्न हा महत्वाचा विषय असणार आहे. परभणी जिल्ह्यात 40 हजार हेक्टर, बीडमध्ये गेल्या वर्षी 67 हजार तर यावर्षी 97 हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा काढला असल्याची सुत्रांची माहिती आहे. यात गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेत जमीन स्वतःची आहे असे दाखवून ऑनलाईन पीक विमा काढला होता त्या प्रकरणात 24 जणांवर गुन्हा नोंद झाला त्यातील 16 आरोपी व 455 शेतकरी बीड जिल्ह्यातील होते. धाराशिव जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या बोगस पीक विमा घोटाळा प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी लक्ष घालत विधीमंडळात आवाज उठवला आहे तर सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी सुद्धा बोगस पीक विमा प्रकार उजेडात आणला होता. राज्यातील पीक विमा घोटाळ्याचा केंद्रबिंदु बीड जिल्ह्यात विशेषत परळीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात 24-25 वर्षात 2 कोटी 11 लाख अर्ज आले त्यातील 3 लाख 32 हजार बोगस प्रस्ताव दाखल झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे. धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्यातील 24 पैकी 16 आरोपी हे बीड मधील असुन 7 जण हे हेळंब व परळी येथील आहेत, त्यात शेतकरी व सीएससी केंद्रचालक यांचा समावेश आहे. परळी, हेळंब यासह आसपासच्या गावातुन मोठे रॅकेट चालविले जात असल्याचा संशय तपास यंत्रणाना आहे. 24 पैकी 19 आरोपीना अटक करण्यात आले असुन 15 जणांना अटक करुन नियमित तर 4 जणांना अटकपुर्व जामीन झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास करुन दोषारोप पत्र पाठवले असुन पुरवणी दोषारोप पत्र पाठविणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात कोट्यावधीचे बोगस पीक विमा प्रकरण उघड झाले असुन 7 एप्रिल 24 रोजी 24 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशी आदेश दिल्यानंतर घोटाळा उघड होऊन कृषी विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेत जमीन स्वतःची आहे असे दाखवून ऑनलाईन पीक विमा काढला या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याने सरकारने 3 कोटी 13 लाख रुपयांचा त्यांचा वाटा हिस्सा म्हणून पीक विमा हप्ता भरला त्यामुळे सरकारची फसवणूक झाली. जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने व त्यांच्या टीमने या प्रकरणाची चौकशी केली त्यानंतर कृषी उप संचालक बाबासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 15 कोटी 68 लाख रुपयांचा पीक विमा मिळावा यासाठी या सगळ्यांनी कट रचून फसवणूक केली त्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करुन 1 हजार 170 शेतकऱ्यांचा पीक विमा भरला. धाराशिव येथील आनंद नगर पोलीस ठाण्यात कलम 420 व अन्य कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असुन पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे याचा तपास करीत आहेत.