धाराशिव –
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असुन सर्व यंत्रणा तयारीला लागलेली असतानाच तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोगस आधार कार्ड, रहिवासी दाखले व इतर कागदपत्रे वापरून तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात नव मतदारांचे अर्ज फॉर्म 6 भरण्यात आले आहेत. बोगस मतदार अर्ज नोंदणीचे हे मोठे रॅकेट असुन निवडणुक आयोगाने याची दखल घेऊन चौकशी व कारवाई करणे गरजेचे आहे.
तुळजापूर मतदार संघात 410 मतदान केंद्र असुन 3 लाख 82 हजार 467 मतदार आहेत त्यात 30 हजार 625 नवीन नोंदणी केलेले मतदार आहेत तर अजुनही नवीन नावे नोंदविणे सुरु आहे. हीच संधी साधत तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस मतदार अर्ज नोंदणी सुरु आहे त्यासाठी एक मोठे रॅकेट व यंत्रणा कामाला लागली आहे. तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावासह अन्य गावात बोगस नावे अर्ज नोंदणी केली आहे, असाच प्रकार इतर गावात देखील झालेला आहे.
आरोही उमेश सगाटे, नीलिमा शेखर रबाळे,शैलेश किशोर सालगे, तुषार पंकज इनागटे या 4 जणांच्या नावाची नोंदणी हंगरगा नळ या गावातील रहिवासी असल्याचे दाखवुन मतदार नोंदणी अर्ज करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे या गावचे नागरिक नसुन त्यांना गावात कोणीही ओळखत नाही. फॉर्म 6 भरताना त्यांनी स्थानिक नागरिक असल्याचे काही पुरावे जोडले आहेत ते ही बोगस आहेत. याबाबतची सर्व कागदपत्रे दैनिक समय सारथीच्या हाती लागली आहेत.