पुढील 5 वर्ष निवडणुक लढविण्यावर बंदी, प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू
धाराशिव – समय सारथी
ग्रामपंचायत निवडणुक लढवीताना झालेला निवडणुक खर्च सादर न करणे भोवले असुन धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील खेड येथील सरपंच,उपसरपंचासह चार सदस्य जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी अपात्र ठरवले आहेत.
विधीज्ञ दत्तात्रय घोडके यांच्या मार्फत रमाबाई गायकवाड यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ब अन्वये सचिन सुरेश जाधव, अर्चना अविनाश राठोड, अब्दुल हमीद शेख, राजश्री रमाकांत कांबळे ,जया दिलीप कांबळे, शरविन शेख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती.
राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या विहित नमुन्यांमध्ये तसेच पद्धतीने निवडणुकीचा खर्च केलेला नाही त्यामुळे त्यांना अपात्र करावे अशी विनंती केलेली होती. जिल्हाधिकारी यांनी विधीज्ञ दत्तात्रय घोडके तुळजापूर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून ग्रामपंचायतचे चार सदस्यसह सरपंच व उपसरपंच यांना अपात्र करण्याचा निर्णय दिला. सदर निर्णयाच्या दिनांक पासून पाच वर्षाच्या कालावधी करिता संबंधित यांना निवडणूक लढविण्यास देखील अपात्र केलेले आहेत.
विधीज्ञ दत्तात्रय घोडके जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य व सरपंच अपात्र होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे सदर ग्रामपंचायतवरती सध्या प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती विधिज्ञ घोडके यांनी दिली आहे.