धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात फरार आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांना अटक करण्यात आली आहे, पोलिसांच्या दोषारोपपत्रानुसार कदम हे तस्कर गटातील आरोपी आहेत. स्थानीक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलिसांनी त्यांना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, पोलिसांची त्यांच्यावर गेली अनेक दिवसांपासुन नजर होती, ते त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना तिथे भेटायला येणार होते अशी माहिती आहे.
पोलिसांचे दप्तरी ‘खबरी’ असलेले विनोद गंगणे यांच्या ‘टीप’ नंतर पोलिसांनी 14 फेब्रुवारी 2025 रोजी तामलवाडी येथे कारवाई करीत 3 जणांना ड्रग्जसह पकडले, त्यानंतर 2 महिने तपास करुन 15 एप्रिल 2025 रोज धाराशिव कोर्टात दोषारोप पत्र दाखल करताना कदम यांना 36 वा आरोपी म्हणुन फरार घोषित केले होते, त्यानंतर ते गेली 2 महिन्यापासुन फरार होते, त्यांनी अटकपुर्व जामिनीसाठी धाराशिव कोर्टात अर्ज केला होता मात्र 28 मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालधीश टी जी मिटकरी यांनी तो फेटाळून लावत जामीन नाकारला होता. अखेर पोलिसांचा शोध थांबला आहे. सपोनि गोकुळ ठाकुर हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 38 आरोपी असुन त्यातील 22 जण अटकेत असुन 15 जन फरार आहेत तर अलोक शिंदे यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांची विविध पथक घेत आहेत, आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची यानिमित्ताने शक्यता आहे. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.
फरार आरोपी (15) – माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 15 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.