पालकमंत्री व प्रशासनाची ठोस भुमिका – 3 केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव निर्णयासाठी प्रलंबित
धाराशिव – समय सारथी
परवाना नसताना कला केंद्र सुरु करून नियमांचा भंग केल्या प्रकरणी आळणी येथील साई कला केंद्रावर तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परवाना नसताना हे कला केंद्र 2018 पासुन अनधिकृतरित्या सुरु होते तसेच इथे वारंवार नियमांचा भंग केला जात होता त्यामुळे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशाने गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कारवाईचा प्रस्ताव दिला होता.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने साई कला केंद्राला प्रशासनाने काल सील करून ते बंद केले होते त्यानंतर आज फौजदारी गुन्हा नोंद केला आहे. रंगमंचावर कला सादर न करणे व तिथे लावणी पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांना तिकीट दिले नसल्याचे समोर आले. अनेक कला केंद्र नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. इतर 3 कला केंद्राचा परवाना रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक खोखर यांनी पाठवला असुन तो जिल्हाधिकारी स्तरावर निर्णयासाठी प्रलंबित आहे.
धाराशिव तहसिल कार्यालय येथील उपलब्ध असलेल्या संचिकेचे अवलोकन केले असता तत्कालीन तहसिलदार यांचे आदेशानुसार 1 मार्च 2018 रोजी साई लावणी कलाकेंद्रचा परवाना रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे आणि त्यानंतर या संचिकेतील उपलब्ध कागदपत्राची तपासणी केली असत सदरील साई कलाकेंद्रास तहसिल कार्यालय धाराशिव यांचे मार्फतीने कुठल्याही प्रकारची नुतन परवाना/परवानगी दिल्याचे आढळून आले नाही.
स्थानिक गुन्हे शाखा यांनी इथे छापा टाकून 20 फेब्रुवारी 2025 मध्ये धाराशिव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम 223 नुसार गुन्हा दाखल केला. साई कला केंद्राचा परवाना रद्द करणे बाबतचे अहवालवरुन भविष्यात सदर कला केंद्राचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कारवाई करावी असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवला.
विनापरवाना अनाधिकृतपणे लोकनाट्य कला केंद्र चालविल्याबद्दल नियमानुसार गुन्हा नोंद करण्याची आवश्यक ती कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. संदिप कोकाटे यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील तुळजाई, येडशी येथील पिंजरा कला केंद्र परवाना रद्द करून पिंजरा व साई कला केंद्र सील केले आहे तर नटरंग व चंद्राई कला केंद्र परवाना प्रस्तावात कागदपत्रे त्रुटी असल्याने अर्ज फेटाळला आहे. महाकाली कला केंद्राचा परवाना रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे, त्या बाबत उच्च न्यायालयात शपथपत्र दिले जाणार आहे.
बंद खोलीत कला सादर केल्यास कायदेशीर कारवाई करू अश्या नोटीसा पोलिसांनी दिल्या आहेत, कला मंचावर कला सादर करावी, ग्राहकांना तिकीट द्यावे असा नियम आहे मात्र सर्रास स्वतंत्र बंद खोलीत हा प्रकार सुरु होतो, पारंपरिक पद्धती ऐवजी डीजे लावुन लावणीच्या नावाखाली ‘छमछम’ सुरु आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने कारवाई करू नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय दबाव टाकला जात आहे मात्र जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कायदेशीर भुमिकेवर ठाम आहेत.
लावणी ही महाराष्ट्राची लोककला असुन ती जपली पाहिजे मात्र कलेच्या नावावर कोणी चुकीचे करीत असेल तर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले असुन ते प्रशासनाच्या पाठीशी आहेत.