मार्च 2027 अखेरपर्यंत धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेचे काम पुर्ण होणार
धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव झाले असले तरी रेल्वे स्थानकाचे नाव उस्मानाबाद वापरले जात आहे मात्र येत्या आठवड्यात उस्मानाबादचे धाराशिव नाव करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नाहरकत दिल्यानंतर राज्य सरकारने नाव बदलाबाबत राजपत्र अधिसूचना काढल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकारी यांची बैठक घेतली त्यात त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. धाराशिव रेल्वे स्थानकाचा वापर व्यापारी हेतूने करण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने 16 एप्रिल रोजी नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने याबाबत 25 एप्रिल रोजी अधिसुचना काढली आहे. नावातील स्पेलिंग व इतर बाबी पुर्ण होऊन येत्या आठवड्यात रेल्वे स्थानकावर धाराशिव बोर्ड लावण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, पोलिस, न्यायालयासह अन्य विभागात धाराशिव हे बदललेले नाव वापरले जात आहे मात्र केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे विभागात उस्मानाबाद हे नाव वापरले जात आहे मात्र ते आता लवकरच धाराशिव असे होणार आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे तुळजापूर हे रेल्वेने जोडण्यात यावे ही गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे, तो रेल्वेमार्ग प्रत्यक्षात येणार आहे. मार्च 2027 पर्यंत काम पुर्ण होऊन हा रेल्वेमार्ग तयार होणार आहे यामुळे धाराशिव तुळजापूर सोलापूर हे रेल्वेने जोडले जाणार आहे.धाराशिव रेल्वे स्थानकाचे सुशिभोकरण व विविध विकास कामे सुरु आहेत त्यांचा खासदार व आमदार यांनी आढावा घेतला. स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या होत्या हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते पुन्हा जुने काम उखडून टाकून नवीन करण्यात सांगितले.