मी पण तुळजापुरचा पाटील.. पुन्हा बाळा… कुत्र्याची उपमा ते डॉबरमॅन
तुळजापूर – समय सारथी
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील कार्यक्रमात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांच्यात जोरदार वाद होत खडाजंगी झाली. सिंदफळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यात दोन्ही पाटील आमनेसामने आल्याने गोंधळ उडाला. कार्यक्रम राजकीय की प्रशासकीय यावरून वादाला सुरुवात झाली, कार्यक्रम प्रशासकीय असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह यांनी सांगितल्यावर धीरज पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व इतर आजी माजी लोकप्रतिनिधी यांना का बोलावले नाही असा सवाल करीत आक्रमक झाले. तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला त्यांचे नाव सुद्धा घेत नाही व श्रेय डॉ पद्मसिंह पाटील यांना देता असा सवाल केला.
आमदार राणा यांनी बाळा म्हणताच पुन्हा वाद पेटला, तु धाराशिवचा पाटील असशील पण मी पण तुळजापूरचा पाटील आहे असे म्हणत आव्हान दिल्यानंतर शाब्दिक वाद वाढला. अंगाला हात लावू नका इथं पर्यंत हमरीतुमरी गेली. शेतकऱ्यांना भुसंपादन मावेजा दिला नाही यासह अन्य मुद्दे वादात भर घालणारे ठरले. कार्यक्रम स्थळावरून जाताना राणा पाटील यांनी पत्रकारांना चावणाऱ्यांची प्रतिक्रिया घेताय का असे म्हणतात धीरज पाटील यांच्यावर निशाणा साधला त्यावेळी धीरज पाटील यांनी प्रतिउत्तर देत राणा पाटील यांना डॉबरमॅनची उपमा देत भौ भौ असे हिणवले व त्यांच्या वागण्याचा व वक्तव्याचा निषेध व्यक्त केला त्यानंतर विनोद पिटू गंगणे, संतोष बोबडे यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला त्यांनी सुद्धा आमदार राणा यांचे वागणे चुकले असे मान्य करीत पाटील यांना शांत केले.
यापूर्वी बाळा शब्दावरून आमदार राणा व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा वाद झाला होता, त्यानंतर पुन्हा बाळा या शब्दावरून धीरज पाटील व आमदार राणा यांच्यात वाद झाला. बाळा असे बोलणे आमदार राणा यांना चांगलेच अंगलट आल्याचे दिसले.
शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही, तब्बल 10-12 वर्ष झाले तरी शेतकरी मदतीपासुन वंचित आहेत त्याचं बरोबर कामे अपूर्ण असताना कार्यक्रम केले जात आहेत हे खपवून घेतले जाणार नाही असा सवाल आमदार राणा यांना करण्यात आला त्यावेळी आमदार राणा यांनी हा कार्यक्रम प्रशासनाने आयोजित केला आहे त्यामुळे अधिकारी यांना विचारा असे सांगितले. धीरज पाटील व इतर लोक प्रश्न विचारत असताना आमदार पाटिल यांनी त्यांच्या खास शैलीत स्मित हास्य केले तेव्हा तुम्ही असे हसू नका, उत्तर द्या असे पाटील म्हणाले. त्यानंतर राजकीय नौटंकी बंद झाली असेल तर बाहेर जा, पळ काढु नका असे आमदार राणा हे म्हणाल्यावर वाद चिघळला. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत इथे बसू असे म्हणत धीरज पाटील यांनी ठिय्या मांडला व कार्यक्रमात शेवटपर्यंत उपस्थितीत राहिले. त्यानंतर निघताना पुन्हा आमदार राणा यांनी धीरज पाटील यांना डीवचल्यानंतर वाद विकोपाला गेला.
काँग्रेस आक्रमक – डॉबरमॅन कुत्रा आणत आंदोलन करीत निषेध
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी प्रश्न विचारणाऱ्या शेतकरी व धीरज पाटील यांना चावणाऱ्या कुत्र्याची उपमा दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त केला. वादावेळी धीरज पाटील यांनी राणा पाटील यांना डॉबरमॅनची उपमा दिली होती त्यामुळे आंदोलनस्थळी डॉबरमॅन जातीच्या कुत्र्याला आणत ए राणा भुंकू नकोस असे म्हणत उपहासात्मक आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले.
नेत्यांचे भांडण मैदानात तर कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर रिल्स, पोस्टरबाजी
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व धीरज पाटील यांच्यात खडाजंगी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते यांनी यात उडी घेतली व फेसबुकसह अन्य सोशल मीडियावर रिल्स व पोस्टरबाजी केली. खरा पाटील कोण, डॉबरमॅन नामकरण, हाती चले बाजार कुत्ते भौके यासह निक्कीच्या बाई काय हा प्रकार, लोकनायक, काही दिलसे असे गाणे लावत समर्थनार्थ रिल्स तयार करण्यात आल्या. तुळजापूर मतदार संघातील वाद धाराशिव पर्यंत येऊन पोहचला.