धाराशिव – समय सारथी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीची घोषणा केली असुन 10 जुलै रोजी जरांगे पाटील हे धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. या शांतता रॅलीच्या नियोजनासाठी 23 जुन रोजी सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्हा नियोजन बैठक समर्थ नगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार असुन याला उपस्थितीत राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीची घोषणा केली आहे. आमरण उपोषण नंतर त्यांनी या रॅलीची घोषणा केली असुन 6 जुलै रोजी हिंगोली पासुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड,12 जुलै जालना व 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शांतता रॅली निघणार आहे, या रॅलीचे नियोजन करण्यासाठी मराठा समाजाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व मराठा एका ठिकाणी एकत्र येणार आहे, कोणीही विखरून थांबणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.