धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात भाजपचे कार्यकर्ते तथा तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे यांना धाराशिव येथील कोर्टाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जमदाडे यांना अटक केल्यानंतर 17 मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एस गुप्ता यांच्या कोर्टात हजर करण्यात आले यावेळी 7 दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली ती मंजुर केली. जिल्हा सरकारी वकील ऍड सचिन सूर्यवंशी यांनी मुद्देसुद युक्तिवाद केला तो ग्राह्य धरण्यात आला शिवाय तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी स्वतः हजर राहून पोलिस कोठडी गरजेचे असल्याचे सांगितले.
ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी 10 हजार 744 पानाचे चार्जशीट कोर्टात दाखल केले असुन त्यातील 36 पैकी 26 आरोपी हे तस्कर गटात असुन 10 आरोपी हे सेवन गटात आहेत. पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे हे सेवन गटातील अटक झालेले पहिले आरोपी असुन त्यांना 7 दिवसांची कोठडी दिली आहे. सेवन गटातील आरोपीला अटक केल्यावर पोलिस, कोर्ट काय भुमिका व निर्णय देते याकडे फरार आरोपींचे लक्ष लागले होते मात्र त्यांची निराशा झाली असुन खळबळ उडाली आहे. एकंदरीत सेवन गटाचा डाव फसला आहे, मा कोर्टाने हे प्रकरण सामाजिक दृष्ट्या गंभीरतेने घेतले असुन तस्कर व सेवन यांना कोठडी दिली आहे. जिल्हा न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी 9 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत.
जिल्हा सरकारी वकील ऍड सचिन सुर्यवंशी यांनी कोर्टात बाजु मांडताना सांगितले की, अटक आरोपी याचे ड्रग्ज तस्करासोबत थेट आर्थिक व्यवहार झाले असुन कॉल डिटेल संभाषण सापडले आहे. आरोपी जमदाडे यांनी आणखी कोणासोबत आर्थिक व्यवहार केले हे निष्पन्न करणे आहे. कॉल डिटेल व इतर तांत्रिक माहिती तपासणे आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार आहे त्यामुळे आरोपी व त्याचा ड्रग्ज गुन्ह्यातील सहभाग, इतर आरोपी सोबतचे संबंध तपासणे आहे. त्याने ते ड्रग्ज कशासाठी घेतले होते याचा तपास करणे बाकी आहे. आरोपी फरार आरोपींच्या संपर्क असु शकतो त्यांचा ठावठिकाणा कळू शकतो. प्राथमिक तपासानुसार चार्जशीट दाखल केले आहे, ते ड्रग्ज कशासाठी वापर होता हे तपासणे आहे. प्राथमिक पुराव्याच्या आधारे दोषारोप पत्र दाखल केले आहे त्यात अटक आरोपी यांच्या पुरता मर्यादित तपास झालेला आहे.इतर आरोपींचा सहभाग व तपास करणे बाकी आहे त्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सुर्यवंशी यांनी सादर केला.
तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी कोर्टात बाजु मांडताना सांगितले की, 14 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे त्यात 20 आरोपी फरार असुन 16 अटकेत आहेत. अटक आरोपी जमदाडे यांचे मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संतोष खोत, आरगडे, मुळे व चव्हाण या 4 जणांशी आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल सापडले आहेत. अटक आरोपीचा मोबाईल जप्त करणे, बँक स्टेटमेंट व इतर माहिती हस्तगत करणे आहे. अटक आरोपी व फरार आरोपी याचा तपास करणे बाकी आहे. फरार आरोपीचा ठावठिकाणा जमदाडे यांना माहिती असुन शकतो. सविस्तर तपास करण्यासाठी 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली.
आरोपी दमदाडे यांच्या वतीने ऍड प्रवीण लोमटे यांनी बाजु मांडली. पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र सादर केले असुन तपास झालेला आहे, आरोपीचा सेवन गटात सहभाग असल्याचे चार्जशीटमध्ये नमुद केले आहे. विक्री करणारे लोकांकडुन ड्रग्ज सेवणासाठी घेतले आहे असे नमुद आहे. चार्जशीटनुसार तपास झाला आहे, त्या सोबत बँक स्टेटमेंट जोडले आहे. कलम 27 नुसार आरोपीवर दोषारोप ठेवला असुन त्याला 1 वर्षाची शिक्षा व 10 हजार दंड आहे. गुन्ह्यातील सेवनाचा आरोप स्वरून तितके गंभीर नाही. तपासात इतर आरोपी 36 नावे निष्पन्न झाली आहे, जमदाडे यांना अटक केली आहे ते 1 दिवस पोलिस ताब्यात होते त्यात माहिती दिली आहे. दोषारोपपत्रासोबत बँक स्टेटमेंट जोडले आहे त्यामुळे कोठडीची आवश्यकता नाही, न्यायालयीन कोठडी द्यावी असा युक्तिवाद ऍड लोमटे यांनी केला.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.