धाराशिव – समय सारथी
परंडा येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्याचा पुन्हा एकदा तपास करावा असे आदेश कोर्टाने दिले असुन पोलिसांना तपासाची कागदपत्रे व चार्जशीट देण्यात आली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात क समरी दाखल केली होती त्यानंतर पुन्हा तपास करावा असा अर्ज दिला होता त्यावर 6 मे रोजी सुनावणी झाली, कोर्टाने समरी अहवाल रद्द करीत तपासाला परवानगी दिली आहे. भाजप नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी या बाबत काही प्रश्न उपस्थितीत करीत पुन्हा तपास करावा अशी मागणी केली होती, त्याला यश आले आहे.
परंडा गुन्ह्यात प्रयोगशाळा तपासणीत ड्रग्ज ऐवजी कॅल्शियम क्लोराईड सापडले होते. परंडा येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी सुरु असुन बार्शी पोलिसांनी कारवाई केली त्यानंतर भाजप नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी यात अनेक प्रश्न व मुद्दे उपस्थितीत करीत गुन्ह्याचा तपास नव्याने करावा अशी मागणी केली त्याला यश आले आहे. यात ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली, त्यानंतर पोलिसांना कोर्टातील भुमिका बदलावी लागली.
गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्यावरून सदरच्या गुन्हयात अधिकचा पुरावा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ड्रग्ज बाळगणे, विक्री करणे हे समाज विघातक कृत्या असुन त्यामुळे तरूण वर्ग ड्रग्जच्या आहारी जावुन गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे, तरी पोस्टे परंडा गुरनं 10/2024 कलम 8 (क), 20 (ब) एनडीपीएस ऍक्टमध्ये पाठविलेल्या ‘क’ फायनल मध्ये अधिक तपास करण्याची परवानगी व गुन्हयाचे कागदपत्र मिळण्याची लेखी विनंती धाराशिव पोलिसांनी कोर्टात केली आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी परंडा अतिरिक्त सत्र न्यायालयात पत्र दिले होते त्यानंतर कोर्टाने आज तपासाचे आदेश दिले.
परंडा येथे 19 जानेवारी 2024 रोजी दाखल गुन्ह्यात 8.33 ग्रॅम ड्रग्ज जप्त करीत पुणे जिल्ह्यातील मुंडवा येथील इम्रान नसिर शेख याला पनवेल पासिंगची एमएच 46 एयु 2832 गाडीसह अटक केली होती तर परंडा शहरातील मुजावर गल्ली येथील अन्वर उर्फ अण्णा जलील अत्तार याला 26 ऑगस्ट 2024 रोजी अटक केली होती.आता पुन्हा तपासात काय निष्पन्न होते हे पाहावे लागेल.