धाराशिव – समय सारथी
उमरगा विधानसभा मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार 43 हजार 944 मतांची आघाडी मिळाली आहे. मतमोजणी अखेर महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना 62 हजार 725 मते तर ओमराजे यांना 1 लाख 6 हजार 669 इतकी मते मिळाली आहेत. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 3 हजार 835 इतकी मते मिळाली आहेत.
उमरगा- लोहारा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना पक्षातुन चौगुले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गेले आहेत शिवाय माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी मंत्री बसवराज पाटील यांची त्यांना साथ होती तरी देखील मतदार यांनी त्यांना नाकारले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चौगुले हे 25 हजार 586 मतांनी विजयी होत निवडून आले आहेत मात्र 2024 च्या लोकसभेत उमरगा विधानसभा मतदार संघात ओमराजे यांना 43 हजार 944 मतांचा फरक असल्याने चौगुले यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत उमरगा विधानसभा मतदार संघाने शिवसेनेला 19 हजार 676 मतांची आघाडी दिली होती. शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 86 हजार 902 मते तर राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांना 67 हजार 226 मते मिळाली होती. मात्र 2024 च्या निवडणुकीत 24 हजार 268 मतांची अधिक आघाडी ओमराजे यांना मिळाली आहे.
उमरगा विधानसभा मतदार संघात 60.30 टक्के मतदान झाले असुन 3 लाख 10 हजार 703 पैकी 1 लाख 87 हजार 348 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उमरगा मतदार संघात मतमोजणीच्या 23 फेऱ्या/राऊंड झाल्या.