24 तारखेला मेळावा होणार नसल्याबाबत नवनियुक्त ओबीसी कोअर कमिटीचा खुलासा
धाराशिव – समय सारथी
ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी येत्या 24 तारखेला धाराशिव येथे महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे काहीजण सांगत आहेत. परंतु या मेळाव्याची तारीख अद्याप निश्चित झालेली असून महाराष्ट्रातील कोणतेही पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे मेळाव्याचे मुख्य समन्वयक शब्बीरजी अन्सारी यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे समाजमाध्यमातून गैरसमज पसरवून जनतेची दिशाभूल कोणीही करु नये, मेळाव्याच्या नावाखाली कोणीही अशा लोकांना भीक घालू नये, असे स्पष्टीकरण देत महाएल्गार मेळाव्यासाठी राज्यस्तरीय शिष्टमंडळाने भेटीसाटी यावे, असा ठराव बुधवारी (दि.17) धाराशिव येथील कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
ओबीसी आरक्षणाबाबत काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. त्यानंतर आज (दि.17) धाराशिव येथील रायगड फंक्शन हॉल येथे ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकारी, सदस्य व समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 24 जानेवारी रोजी महाएल्गार मेळावा काढण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तारीख निश्चित झाल्यानंतर ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये मा.आ.प्रकाशजी शेंडगे, महादेवजी जानकर, मा.आ.गोपीचंदजी पडळकर, महाएल्गार मेळाव्याचे प्रमुख समन्वयक शब्बीरजी अन्सारी, लक्ष्मणराव गायकवाड, टी.पी. मुंडे यांच्यासह राज्यातील इतर प्रमुख ओबीसी नेत्यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात येईल असे निश्चित करण्यात आले.
याच बैठकीत धाराशिव येथील महाएल्गार मेळाव्याचे समन्वयक म्हणून मा.धनंजय (नाना) शिंगाडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
त्यानंतर महाएल्गार मेळाव्यासाठी जिल्हास्तरीय कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रा.भालचंद्र हुच्चे, धनंजय शिंगाडे, पांडुरंग (तात्या) कुंभार, आबासाहेब खोत, लक्ष्मण माने, राजाभाऊ माळी, अभिजित गिरी, हरिदास शिंदे, सुनील शेरखाने, संजोग पवार, महादेव खटावकर, मिलिंद चांडगे, सुखदेव डोंगे, संतोष लोहार, दिनेश बंडगर, सतीश लोंढे, सतीश कदम, शिवानंद कथले, शुभम कदम, सुधीर अलकुंटे व इतर बांधवांच्या उपस्थितीत कोअर कमिटी स्थापनेचा ठराव मंजूर करण्यात आला.