धाराशिव – समय सारथी
प्रभारी जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला असुन त्यांच्या कामांची चौकशी करावी अशी मागणी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे. महामुनी यांच्या कार्यकाळातील सर्व कामांचे स्पेशल ऑडिट करावे अशी मागणी केल्याने काय होते हे पाहावे लागेल.
प्रभाकर महामुनी यांनी धाराशिव जिल्ह्यात जलसंधारण विभागाकडे येणाऱ्या अनेक कामात अनियमितता व अपहार केल्याचा आरोप केला असुन सर्व कामांची चौकशी तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांकडून करावी अशी मागणी धस यांनी केली आहे.
पाझर तलाव दुरुस्ती, नवीन सिमेंट बंधारे बांधणे, जुन्या सिमेंट बंधाऱ्यांचे नूतनीकरण करणे, इत्यादी सर्व कामे करणाऱ्या ठेकेदारांकडे पैसे घेऊन निकृष्ट व बोगस कामे दिलेले आहेत व काम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना कामांची देयके अदा केलेली आहेत. काही कामे केलेलीच नाहीत फक्त कागदोपत्री कामे दाखवून त्या कामांची बिले अदा केलेली आहेत.
सिमेंट बंधारे कामांचे सविस्तर अंदाज पत्रकांच्या रकमा कृषी विभागाच्या अंदाजपत्रकाच्या तिप्पट वाढविलेले आहेत. एवढे असूनही कामांचा दर्जा मात्र कृषि विभागाकडील कामांपेक्षा निम्मा देखील नाही. याच तिप्पट वाढविलेल्या रकमेतुन भ्रष्टाचार केला आहे, त्यासाठी जलसंधारण विभाग कंत्राटदारां कडून घेतली जात आहे.
जुन्या पाझर तलाव दुरुस्तींची कामे न करताच फक्त किरकोळ कामे करून कामांच्या बिलाच्या रकमा अदा केल्या आहेत.अशीच बाब सिमेंट नालास बांध दुरुस्ती, गाव तलाव, इतरे क्षेत्र उपचार आणि ओघळ उपचाराच्या कामात देखील केला जात आहे. जलसंधारण विभागाच्या भौतिक व आर्थिक कामांची सखोल तपासणी करावी अशी मागणी धस यांनी केली आहे.












