आमदार तानाजीराव सावंत यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग, विजयाचा संकल्प
धाराशिव – समय सारथी
जिल्हा परिषदेत शिवसेना की हायब्रीड पार्टी निवडून द्यायची हे तुम्हीच मतदारांनो ठरवा असे म्हणत आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले. सत्ता आल्यास विकास करू, सावंत यांनी इंदापूर व ढोकी येथे 2 विजयी संकल्प मेळावे घेऊन राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट केली. शेतकरी मालक असुन विकासाला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. सर्व पक्षासाठी चर्चेची दारे खुली असुन जशी भुम परंडामध्ये झाले तसे सगळे पक्ष माझ्या सोबत आले तरी त्यांचे स्वागत आहे. पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे काम करून भगवा फडकवण्याचा संकल्प केला.
येत्या 2-3 दिवसात आचारसंहिता लागेल, त्यात 55 सदस्य व पंचायत समितीचे 110 सदस्य निवडुन सत्ता द्या मग आदर्श जिल्हा परिषद कशी चालवायची हे दाखवतो. 5 वर्षात आदर्श जिल्हा परिषद नाही चालली तर जिल्ह्याला तोंड दाखवणार नाही असे वचन त्यांनी मतदारांना दिले. जिल्हा परिषदेत शिवसेना विजयी करून आणायची की हायब्रीड पार्टी आणायची हे तुम्ही ठरवा. तेरणेची अस्मिता म्हणुन आलात त्याबद्दल सावंत यांनी आभार मानले.
बंद पडलेले जिल्ह्यातील 3 कारखाने सुरु केले. तेरणा कारखाना हा 36 हजार सभासद शेतकरी यांचा स्वाभिमान होता तो त्यांनी गहाण टाकला होता तरी आपण गप्प बसतो त्याचे आश्चर्य वाटते. 1 हजार शेअरची किमंत जास्त होती त्यावेळी लोकांनी तो घेतला आणि ह्यांनी ते पैसे घेऊन पुणे,मुंबई येथे नेला व 400 कोटी कर्ज केले, जिल्हा बँक दिवाळखोरीत पाडली. जिल्हा बँकेवर प्रशासक कधी बसेल अशी स्तिथी आहे. हीच अवस्था दुध संघाची असुन सहकारी संस्था मोडून खाल्ल्या, त्यांच्या मुलासाठी वापरल्या व शेतकऱ्याला देशोधडीला लावले असे ते म्हणाले.
हे सगळं ऐकायला गोड वाटतं, गाडीत जाताना चर्चा करायची सावंत यांनी लई धुतलं आणि घरी गेले की विसरून जायचं. मतपेटी पुढे गेले की पुन्हा कमळ व इतर. कुठे गेला शिवसैनिक, हृदयातील बाळासाहेब.. सगळं विसरून जाता अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली. विकास कसा असतो हे मी करून दाखवले. अतिवृष्टी संकटात लोकांना धीर दिला. 2016 ला नाला खोलीकरण, विस्तारीकरण करून शिवजल क्रांती केली नसती तर गावच्या गावे पाण्यात गेली असती हजारो लोकांचे प्राण गेले असते हे वास्तव आहे. संकट आल्यावर नेत्याची किमया कळाली.
तेरणा साखर कारखाना कोणाच्या बापाचा नसुन तेरणा हा 36 हजार सभासद यांचा स्वाभिमान असुन त्यांच्या मालकीचा आहे. मी एक कामगार व निमित्त आहे. तुमची इच्छाशक्ती असल्याने 12 वर्ष तप केले तेव्हा तेरणा कारखाना सुरु झाला. शेतकरी यांचा ऊस असुन कामगार इथला आहे, त्यामुळे उद्योग चालले आहेत. आसपासच्या सर्व कारखानापेक्षा 1 रुपया जास्त भाव देणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. मागे पुढे होईल पण हा माझा शब्द आहे. मी जे बोलतो तेच करतो, माझे तत्व आहे. तेरणेला गत वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
शेतकरी यांना त्यांची शक्ती कळत नही, हनुमानाप्रमाणे शक्ती जागृत करणे गरजेचे आहे. 36 हजार ही ताकत आहे, एका घरात 4 जण म्हणजे 1 लाख 60 हजार मतांचे मालक आहेत त्यामुळे विचार करा, मालक तुम्हीच आहेत, हा तुमचा स्वाभिमान आहे.
माफ करणे हा माझा स्वभाव गुण आहे, समोरच्या डोळ्यात आश्रू पाहु शकत नही, जवळपास 500 ते 700 जणांना मी दत्तक घेतले आहे,त्यांचे पालकत्व स्वीकारत सगळी जबाबदारी घेतली आहे माझ्या पायात चप्पल नव्हती, 700 रुपयावर नौकरी केली. इतरांसारखे इथल्या लोकांच्या रक्ताच्या पैशावर मुंबईत गुंतवणूक केली नाही, मी तिथे कमावले व इथे आणुन देत आहे. मी वारकरी संप्रदायमधील आहे राजकारणसाठी बोलत वक्तव्य करीत नाही. मी परखड वास्तव बोलतो त्यामुळे ते लोकांना लागत, जें आहे ते आहे. भुलथापाना बळी पडू नका, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे अशी खुणगाठ बांधा असे आवाहन सावंत यांनी केले.












