500 रुपये बैठक भत्ता, 750 रुपये मुंबईतील निवास खर्च – महागाईच्या जमान्यात थट्टा, ह्याच साठी पक्ष बदलला का ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात सध्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून गोंधळ सुरु आहे, महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्र या संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची 6 मार्चला निवड झाली. राज्यमंत्री पदाचा दर्जा नसतानाही शासकीय बैठकीत त्यांच्या नावासमोर राज्यमंत्री असा नामउल्लेख केला जात आहे शिवाय एखाद्या मंत्र्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील रोजच्या दौऱ्याला शासकीय प्रसिद्धी दिली जात आहे. राज्यमंत्री पदाचा दर्जा असल्याचा दावा आमदार यांचे सहायक करीत असुन प्रशासनाकडे वेगवेगळ्या सुविधासाठी आग्रह करीत आहेत. पुर्णवेळ डीव्ही कार, शासकीय कार्यालयासह अन्य बाबीसाठी दबाव टाकला जात आहे, त्यामुळे अधिकारी वैतागले असुन घंटा बांधणार कोण ? हा प्रश्न उभा राहिला आहे.
मित्रा संस्थेच्या नियामक मंडळावरील उपाध्यक्ष यांच्या बाबतीत जो निर्णय आहे त्यातील सोयी सुविधाबाबत संभ्रम आहे, त्या सुविधा मित्राच्या संबंधीत बैठका व दौऱ्यासाठी की इतर नियमित शासकीय बैठकासाठी… शासकीय समारंभाच्या वेळी मंत्र्यानंतरचे स्थान असे नमुद आहे, समारंभ व शासकीय बैठका ह्या वेगळ्या असतात. बैठक भत्ता 500 प्रति बैठक नमुद आहे, तो मित्राच्या बैठकीला द्यायचा की नियमित बैठकीला.. एकंदरीत सगळा गोंधळ असुन हा वादग्रस्त मुद्दा केवळ आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे त्यांच्या ‘कौशल्य विकास’ने सोडवू शकतात, त्यासाठी ‘स्वयंस्पष्ट’ निर्णयाची अपेक्षा आहे.
500 रुपये बैठक भत्ता, 750 रुपये मुंबईतील निवास खर्च म्हणजे महागाईच्या जमान्यात एक प्रकारे थट्टा आहे. मुंबईत 750 रुपयात एक दिवस राहून दाखवा व लाख रुपये जिंका अशी बक्षिस योजना यानिमित्ताने अवतरली आहे. मंत्रीपद न देता उपाध्यक्ष पदावर बोळवन करुन जखमेवर मीठ चोळल्यासारखेच आहे. ह्याच साठी का पक्ष बदलला होता असाही सुर उमटत आहे. सन्माना बरोबर भत्ता वाढवा अशी मागणी होत आहे तर दुसरीकडे ते अब्जोपती आहेत फक्त समाजसेवेचे वृत आहे, म्हणुन हे सुरु आहे, भत्त्याचे सोडा, त्यात काय ?
मंत्री व सत्तेचा लाभ मिळावा यासाठी राणाजगजीतसिंह पाटील हे राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले हे सर्वश्रुत आहे. शरद पवार यांनी त्यांना कोणत्याही सभागृहाचे (विधानसभा/विधानपरिषद) सदस्य नसताना थेट राज्यमंत्री केले होते, त्यापूर्वी त्यांना ग्रामपंचायतचा सुद्धा अनुभव नव्हता. मंत्री होण्याची त्यांची महत्वाकांक्षा टोकाची आहे, अनेक वेळा भावी पालकमंत्री, भावी मंत्री म्हणुन त्यांचे अभिनंदन झाले मात्र पदरात निराशा पडली. मित्रा उपाध्यक्षपदाच्या निमित्ताने लाल दिव्याची ‘हौस’ भागवली जात आहे.
या निर्णयावरून प्रशासनात संभ्रम –
31 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र (Maharashtra Institution for Transformation MITRA या संस्थेच्या नियामक मंडळावरील उपाध्यक्ष यांना शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक शासाउ – 10.10/प्र.क्र. 96/10/सा.उ., दिनांक 13/03/2012 मधील तरतूदी विचारात घेवून काही सोयी सुविधा मंजुर करण्यात आल्या आहेत, याबाबत शासन निर्णय नियोजन सहसचिव चित्रकला सुर्यवंशी यांनी काढला आहे.
500 रुपये प्रति बैठक भत्ता, निवासी दुरध्वनी वरील खर्च 3 हजार प्रति महिना, कार्यालयीन कामासाठी वाहन सुविधेवरील खर्च राहील. प्रशासकीय विभागाने वाहन सुविधा चालकासह उपलब्ध करून दिल्यास इंधन व तेलावर 72 हजार प्रतिवर्ष, उपाध्यक्षांना स्वतःचे खाजगी वाहन चालकासह कार्यालयीन कामासाठी अनुज्ञेय असेल तर दरमहा 10 हजार रुपये, बैठकीनिमित्त राहण्याची सोय व किरकोळ बाबी प्रित्यर्थ करावयाचा खर्च मुंबई येथे प्रतिदिन 750 रुपये, प्रवास भत्ता व दैनिक भत्ता सचिव दर्जाचे अधिकारी यांना लागू असलेल्या दराप्रमाणे लागु राहील. दौऱ्यातील सुविधामध्ये शासकीय विश्रामगृह येथे निवासाची व्यवस्था, डीवी वाहन देण्यात येईल. शासकीय समारंभातील स्थान शासकीय समारंभाच्या वेळी मंत्र्यानंतरचे स्थान देण्यात येईल,