पुणे – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कै प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची भेट घेत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सांत्वन केले व त्यांच्या कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदतही त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द करीत त्यांचा मुलगा व 2 मुली यांचे पालकत्व घेतले. आत्महत्या केल्यावर कुटुंब लहान मुलांचे आयुष्य उघड्यावर येते, 4 दिवसानंतर कोणी विचारायला येत नाही, 200 कुटुंबाच्या व्यथा व स्तिथी मी पाहतो हे सांगत असताना मंत्री सावंत भावुक झाले. आत्महत्या करुन परिवाराला शिक्षा देऊ नका त्यांचा विचार करा असे सांगत सावंत यांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन केले.
मराठा समाज त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आहे. समाजाचे देणे म्हणून मंत्री सावंत यांनी यावेळी देठे यांचा मुलगा आणि दोन मुली अश्या तिन्ही पाल्याचे पालकत्व घेतले. या मुलांच्या शिक्षणापासून ते विवाहापर्यंतची सर्व जबाबदार घेत असल्याचे मंत्री सावंत यांनी जाहीर केले.
आत्महत्यासारखे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. मराठा तरुणांच्या आरक्षणाबाबत भावना तीव्र आहेत परंतु त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. न्यायालयाची लढाई चालू आहे, कोणीही हार मानू नये. लवकरच आपल्याला टिकणारे आरक्षण मिळेल.कृपया आत्महत्येचा विचार करू नका अशी हात जोडून विनंती करताना मंत्री सावंत भावुक झाले. आपल्या परिवाराचा विचार करा. घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे असे म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.